शिराळ्यातील सर्व प्रश्न मार्गी लावणार- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
शिराळा प्रतिनिधी : लवकरच शिराळा तालुक्यात येवून येथील महत्वाचे सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आमदार शिवाजीराव नाईक यांना दिले.
वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर आज सांगली जिल्हा दौऱ्यावर आले असता पेठ ता. ( वाळवा ) त्यांचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी स्वागत केले. त्या वेळी ते बोलत होते. आमदार नाईक यांनी वनमंत्री मुनगंटीवार यांना शिराळा दौऱ्यावर येण्यासाठी निमंत्रण दिले. त्यावेळी वनमंत्र्यांनी शक्य असल्यास अधिवेशनापूर्वी अन्यथा अधिवेशनानंतर नक्कीच शिराळ्यास भेट देवून तेथील प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले. चांदोली अभयारण्याच्या अनेंक समस्या आहेत. अभयारण्यातील अनेंक प्राणी नागरी वस्तीत येवून जनावरे व माणसावर हल्ला करीत असल्याने अभयारण्याला कुंपण घालण्यात यावे, मत्स्यबीजसाठी निधी द्यावा, सर्प उद्यान, वारणा जलाशयात बोटिंग, धरणाखाली पैठणच्या धर्तीवर उद्यान विकाशित करावे. अशा प्रकारच्या विविध मागण्यासह नागपंचमी पूर्ववत करण्यासाठी आमदार शिवाजीराव नाईक यांनी राज्य शासनाकडे पाठपुरवठा केला असून यातील विविध प्रश्नांचा अभ्यास करून त्याला मंजुरी देवून तातडीने निधी उपलब्ध करून देण्यासाठी चांदोली अभयारण्यास भेट देण्याची विनंती केली.
शिराळा तालुक्याने उद्दीष्ठापेक्षा जास्त वृक्षारोपण केले असून ते शंभर टक्के जगवण्यासाठी कार्यक्रम राबविण्यात आला असून हे पाहण्यासाठी आपण वेळात वेळ द्यावा अशी मागणी केली.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, इस्लामपूर नगराध्यक्ष निशिकांत पाटील, शिराळा भाजपा तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.