पिशवी पैकी व्हनागडेवाडी येथील विद्यार्थी ट्रॅक्टर खाली सापडून जागीच ठार
बांबवडे प्रतिनिधी.
पिशवी पैकी व्हनागडेवाडी तालुका शाहुवाडी येथील श्रीधर संजय व्हनांगडे वय 14 वर्षे याचा ट्रॉलीचे चाक अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद शाहूवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे .
याबाबत घटनास्थळावरून व पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पिशवी पैकी व्हनागडेवाडी ता. शाहुवाडी येथील श्रीधर व्हनागडे हा इयत्ता आठवी मध्ये बांबवडे येथील महात्मा गांधी विद्यालयात शिकत होता. आज रविवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी त्याची शिष्यवृत्तीची परीक्षा बांबवडे केंद्रावर होती पेपर संपल्यानंतर श्रीधर आपल्या मित्रासोबत पिशवी पैकी व्हनांगडेवाडीकडे पायी चालत निघाला होता. दरम्यान उदय साखर कारखान्याहून ऊस उतरून परत निघालेल्या रिकाम्या ट्रॅक्टर चालकाला पायी चालत निघालेल्या विद्यार्थ्यांनी हात करून थांबवले व त्यात बसून गेल्यानंतर खाली उतरताना ट्रॅक्टर चालकाला न सांगताच तो ट्रॅक्टर मधून उडी मारून खाली उतरला यामध्ये त्याचा तोल गेल्याने तो ट्रॉलीच्या मागील चाकाखाली सापडला यात त्याचा जागीच मृत्यू झाला. श्रीधर हा एकुलता एक होता त्याच्या पश्चात आई-वडील व एक बहीण असा परिवार आहे.मलकापुर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.या घटनेमुळे संपूर्ण पिशवी गावावर शोककळा पसरली आहे.