वारूळ जवळ रस्त्यालगत असलेल्या लाकडाच्या ओंडक्यांमुळे ट्रेलर चा अपघात : सुदैवाने जीवितहानी नाही
मलकापूर प्रतिनिधी : वारूळ तालुका शाहुवाडी इथं रस्त्यालगत ठेवलेल्या झाडांच्या ओंडक्यांना सोळा चाकी ट्रेलर ची धडक बसल्याने, ट्रेलर शेजारीच असलेल्या खड्ड्यात जावून अडकला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

आंबा जवळील वारूळ इथं एका ट्रेलर (क्र. एम. एच. ४२ बी.पी. ९७६३) ची शेजारी असलेल्या ओंडक्यांच्या ढिगाला धडक बसली. आणि ट्रेलर, लगत असलेल्या खड्ड्यात जावून अडकला.

ग्रामस्थांच्या मदतीने चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. यामुळे जीवितहानी झालेली नाही. हा अपघात शनिवार दि.४ मार्च रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान घडला आहे. सदर अपघातामुळे ग्रामस्थांनी ठेकेदाराला पडलेल्या ओंडक्यांच्या ढिगाबद्दल विचारणा केली असता, वनविभाग पास वेळेवर देत नाही, असे उत्तर ठेकेदाराने दिले आहे.

आंबा – कोल्हापूर रस्त्यावर रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. याच अनुषंगाने रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांची कत्तल सुरु आहे. परंतु हि तोडलेली झाडे वनविभागाने पास न दिल्याने रस्त्याच्या कडेलाच ठेवली आहेत. असे कंत्राटदाराचे म्हणणे आहे. त्यामुळे वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना याचा त्रास होत आहे. या ओंडक्याच्या ढिगांमुळे अपघाताला आमंत्रण मिळत आहे.