सलग दुसऱ्या दिवशी मलकापूर नगरपरिषदेची अतिक्रमण विरोधात धडक कारवाई
मलकापूर प्रतिनिधी ( रोहित पास्ते ) :
आज गुरुवार दि. 1 जून 2023 रोजी सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण विरोधी मलकापूर नगर परिषदेची धडक कारवाई सुरु राहिली.

सलग दुसऱ्या दिवशी करण्यात येत असलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईमुळे, मलकापूर बाजारपेठेतील रस्ता मोकळा झाल्याचे दिसत आहे. कायम वाहतुकीसाठी अडथळा ठरणारे बेशिस्त पार्किंग व रस्त्यालगत असणारे बोर्ड हटवण्यात आले. तसेच काही साहित्य जप्त करण्यात आले. नगरपरिषदेने रस्त्याच्या बाजूला रंगीत पट्टी मारून जागा रिकामी केली. बऱ्याच कालावधीनंतर येथील विठ्ठल मंदिराने मोकळा श्वास घेतला असून, उरलेले अतिक्रमण टप्प्याटप्प्याने काढण्यात येणार असल्याचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक विद्या कदम यांनी सांगितले.

यावेळी पार्किंग साठी छत्रपती शिवाजी मैदान, मलकापूर नगरपरिषद मलकापूर शेजारी रिकामी जागा, जिजामाता बालोद्यान या ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे व पार्किंग दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत. हे अतिक्रमण काढण्यासाठी मलकापूर नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.