“अहो कोसळलं आभांळ ,कातरली धरती, “श्रावण ” बाळा, तुझी कशी ओवाळू आरती “
बांबवडे : भारतमातेचा सुपुत्र तिच्या कुशीत चीरशांत निद्रेला पोहचला आहे. आपल्या आईच कर्ज फेडत या सुपुत्राने तिच्या रक्षणासाठी आपला देह ठेवला. याहून दुसरे बलिदान ते काय असावे, याहून दुसरा त्याग तो काय असावा, याच बरोबर या शाहुवाडीच्या गोगवे गावच्या मातेची कूस देखील उध्वस्त झाली, याहून दुसरे समर्पण ते काय असावे. ज्या वडिलाने बोटाला हात धरून शाळेत सोडले, त्या लेकराचे लाड पुरवत मोठे केले, आणि देशाच्या झोळीत आपले सर्वस्वाचे दान सोडले, याहून दुसरा त्याग तो काय असावा.
अहो कोसळलं आभांळ ,कातरली धरती,श्रावण बाळा, तुझी कशी ओवाळू आरती. कारण तुझ्यामुळेच या गोगवे गावाचे व शाहुवाडी तालुक्याचे नाव सीमेवर कोरले गेले आहे. तुझ्यामुळेच या सह्याद्रीला पुन्हा एकदा सार्थ अभिमान लाभला आहे.
इथल्या विद्यामंदिराच्या किलबिलाटात तुझासुद्धा एक हळुवार हुंकार होता, याचे संस्कार सीमेवर कामी येतील, असे कुठल्याच गुरुजनांना वाटले नसावे. परंतु शाहुवाडीच्या कुशीत उगवलेलं हे ‘रानफुल ‘ चंदनाच्या गंधाला देखील लाजवेल, असा सुगंध संपूर्ण आसमंतात भारावून गेलं. इतर सुगंध कधीतरी लोप पावेल, पण रांगड्या जवानाच्या बलिदानाच सुगंध या देशातच नव्हे, तर दुष्मनालादेखील जरब बसेल, असाच दरवळला आहे.
माने कुटुंबीयांनी जोपासलेली देशसेवेची कृतार्थ परंपरा अवघ्या देशाला प्रेरणादायी आहे. ज्या मातेने अशा वीरपुत्राला जन्म दिला, त्या मातेला सर्वार्थाने मानाचा मुजरा .
अहो आपल्या लेकाराला जरा कुणामुळे खरचटलं, तर त्याची आई त्या व्यक्तीच्या अंगावर वाघिणीसारखी धावून जाते, या मातेने तर तीचं अवघं विश्व या देशाच्या पदरात टाकलं आहे. म्हणूनच अशा वीरमातेला सन्मानपूर्वक मानाचा मुजरा.
आपल्या शाहुवाडी तालुक्यातील एका वीर जवानाला हौतात्म्य पत्करावं लागलं,असे असताना, तालुक्याचे प्रतिनिधित्व केलेले लोकप्रतिनिधी मात्र, अशा विराला अखेरचा निरोप द्यायला उपस्थित नव्हते, अशा लोकप्रतिनिधींना काय म्हणावे, कामं हि तर आयुष्याला लागलेली असतात, एकतर देशसेवेसाठी आपलं कधी योगदान नसतं, पण जर आपलं प्रतिनिधित्वं देशासाठी लढत असेल, आणी त्याला हौतात्म्यं प्राप्त झालं असेल, तर अशावेळी त्या वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी, आपली उपस्थिती गरजेची च असावी, असं आम्हाला वाटतं,बाकी आपण सुज्ञ आहातंच.
पुन्हा एकदा शाहुवाडी च्या या शहीद वीराला आमच्या ‘साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स ‘ व ‘एसपीएस न्यूज ‘ च्या वतीने सन्मानपूर्वक अभिवादन. भावपूर्ण आदरांजली.