शिराळा-कापरी रस्त्यावर बोलेरो-मोटरसायकल अपघातात १ ठार तीन जखमी
शिराळा : कापरी तालुका शिराळा येथील कापरी-शिराळा च्या मुख्य रस्त्यावरील वळणावर बोलेरो व मोटरसायकल च्या झालेल्या अपघातात डॉ.एकनाथ राजाराम पाटील (वय ५५ वर्षे )रहाणार कापरी हे ठार झाले आहेत. त्यांच्या पत्नी सुनिता एकनाथ पाटील राहणार कापरी ,व शिराळा कृषी उत्पन्न बाजार समिती चे सचिव कृष्ण दादू मगदूम व त्यांच्या पत्नी शारदा रहाणार येडेनिपाणी तालुका वाळवा हे तिघेजण जखमी झाले आहेत. हि घटना आज दि.१५ जून रोजी सायंकाळी पावणेपाच वाजनेच्या दरम्यान घडली.
याबाबत जखमी कृष्णा मगदूम यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली आहे. बोलेरो चालक जितेंद्र शिवाजीराव देशमुख रहाणार सागाव तालुका शिराळा यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि,डॉ. एकनाथ पाटील आणि त्यांची पत्नी सुनिता हे दोघेजण मोटरसायकल क्र.एम.एच.१० -टी- ३१५१ व शिराळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव कृष्णात ज्ञानू मगदूम हे पत्नी शारदा सह मोटरसायकल क्र.एम.एच.१०-ए.एस.-८१३१ वरून शिराळाहून कापरी कडे निघाले होते.त्यावेळी कापरी येथील अमोल पाटील यांच्या शेताजवळील वळण रस्त्यावर समोरून आलेल्या बोलेरो गाडी क्र.एम.एच.१०-ए -९७४३ ने डॉ.पाटील यांच्या मोटरसायकल ला धडक दिली. त्या धडकेत पाटील यांचा उजवा पाय मोडला, तर त्यांच्या पत्नी सुनिता या गाडीवरून पडल्यामुळे जखमी झाल्या. त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या मगदूम यांच्या मोटरसायकल ला बोलेरो गाडी ची धडक बसल्याने ते सुद्धा गाडीवरून पडले .यामध्ये कृष्णा मगदूम व त्यांची पत्नी शारदा यासुद्धा जखमी झाल्या.
जखमींना ग्रामस्थांनी शिराळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, उपचार दरम्यान डॉ.पाटील यांचा मृत्यू झाला. डॉ.पाटील हे वारणा- मोरणा फळे, फुले,भाजीपाला संघाचे माजी संचालक होते. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, एक भाऊ , भावजय असा परिवार आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.एन.वाईकर करीत आहेत.