महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची शहीद माने कुटुंबाला सांत्वनपर भेट: आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन
बांबवडे : शहीद जवान श्रावण माने यांच्या कुटुंबियांना केंद्र आणि राज्य शासनाकडून अठरा लाख रुपये आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असून, त्यासंदर्भात प्रांताधिकाऱ्यांना तातडीने प्रस्ताव तयार करून, सरकारकडे पाठवण्याचे आदेश दिले असल्याचे महसूल तथा पालकमंत्री नाम. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान नाम. चंद्रकांत पाटील यांनी गोगवे तालुका शाहुवाडी येथील शहीद श्रावण माने यांच्या कुटुंबाला सांत्वनपर भेट दिली. यावेळी त्यांनी हि माहिती दिली.
नाम. चंद्रकांतदादा पाटील यांना राज्य सरकार ने नुकत्याच घोषित केलेल्या शेतकरी कर्जमुक्ती च्या निर्णय प्रक्रियेत अडकून पडल्यामुळे शनिवारी वीर जवान श्रावण माने यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येता आले नाही. माने कुटुंबातील दहा लोक लष्करी सेवेशी जोडले आहेत. यावरून या कुटुंबाचे देशप्रेम आदर्शवत आहे. शहीद जवान श्रावण माने यांच्या रूपाने उमद्या सदस्याला हे कुटुंब मुकले आहे. या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नसून, केंद्र शासनाच्या माध्यमातून दहा लाख रुपये, व राज्य शासनाच्या माध्यमातून आठ लाख रुपये आर्थिक मदत मिळवून देणार आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी नव्यानेच सुरु केलेल्या जवानांच्या केंद्रीय आयुर्विमा योजनेतून या कुटुंबाला चोवीस लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली जाईल, असेही मंत्री पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दरम्यान आज सोमवारी दि.२६ जून रोजी दुपारी चारच्या सुमारास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे माने कुटुंबाच्या घरी आगमन झाले. यावेळी वीर पिता बाळकू माने, वीर माता शोभाताई, बंधू सागर माने, मामा सुरेश सूर्यवंशी यांचे सांत्वन करून दुःख व्यक्त केले.
यावेळी उपस्थित गोगवे ग्रामस्थांनी शहीद जवान श्रावण यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या गायरानात क्रीडा संकुल उभे करून, त्यास वीर जवान श्रावण माने यांचे नाव देण्याची मागणी केलीय. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देवून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच वीर पीता बाळकू माने यांना माजी सैनिकांसाठी मिळणारी शेतजमीन प्रयत्न करूनही अद्याप मिळालेली नाही.आजतागायत माने पती-पत्नी दुसऱ्यांची शेती भोगवटा पद्धतीने कसत आहेत. याकडे ग्रामस्थांनी लक्ष वेधले असता ,या प्रकरणातून सुद्धा मार्ग काढण्याचे आश्वासन नाम.पाटील यांनी दिले.
यावेळी प्रांताधिकारी पवार, तहसीलदार चंद्रशेखर सानप , विश्वेश कोरे, डीवायएसपी आर.आर.पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, प्रवीण प्रभावळकर, दाजी चौगुले, महादेव पाटील-साळशीकर, नाभीक समाजाचे जिल्हा अध्यक्ष सयाजीराव झुंजार, कोजीमाशीचे माजी अध्यक्ष दादासाहेब लाड, मेजर राजाराम पाटील, मेजर आनंदा माने, मेजर सदाशिव माने, पोलीस निरीक्षक अनिल गाडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पडवळ यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.