शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी : ऐतिहासिक आंदोलनाला यश :उच्चाधिकार समितीचे आभार
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक आंदोलनाला यश आले असून राज्यातील शेतकऱ्यांना तत्वतः सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय उच्चाधिकार समितीच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे.
शेतकऱ्यांची सुकाणू समिती आणि मंत्रीगटाची उच्चाधिकार समिती यांची बैठक मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहात संपन्न झाली. यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांसदर्भात सुकाणू समिती बरोबर सकारात्मक चर्चा झाली.
सरकारने सकारात्मक चर्चा करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे १३ जून ला होणारे ‘ रेल रोको ‘ आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
आजपासून शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळणार आहे, अशी हमी शासनाने दिल्याची माहिती सुकाणू समितीचे सदस्य खासदार राजू शेट्टी यांनी दिली. तसेच सरकारच्या तिजोरीत करदात्यांचा पैसा आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा फायदा धनदांडग्यांना होवू नये, यासाठी शेतकरी संघटना प्रयत्न करेल ,असेही राजू शेट्टी यांनी सांगितले.
दरम्यान अधिवेशनापूर्वी म्हणजे २५ जुलै पूर्वी शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा झाला नाही, तर पुन्हा आंदोलन केले जाणार असल्याचा, इशारा ही राजू शेट्टी यांनी यावेळी दिला आहे. दरम्यान स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू होण्याबाबत मुख्यमंत्री सर्व पक्षीयांसोबत पंतप्रधानांना भेटायला जातील. शेतकऱ्यांना सरकारवर कायम अवलंबून रहावे लागू नये. यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी गरजेच्या आहेत. सरकारच्या उच्चाधिकार समितीत नामदार दिवाकर रावते हि होते. शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांसोबत असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शासनाच्या समितीच्या या ऐतिहासिक निर्णयाने छोट्या शेतकऱ्यांमध्ये समाधान पसरले आहे. यावेळी सुकाणू समिती चे सदस्य असलेले रघुनाथ दादा पाटील यांनी सांगितले कि, शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे नागरिकांना त्रास झाला आहे,परंतु त्याचे फलित चांगले मिळाले असून, शेतकरी तत्वतः सुखावला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी सरकारचे आभार मानले.