कृष्णा विद्यापीठ जगातील प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ होईल-डॉ. भटकर
कोडोली प्रतिनिधी:- सनी काळे ,(संदीप शिंदे,कराड):
समृद्ध ज्ञान ही भारताची खरी ताकद असून, देशातील अनेक विद्यापीठे अव्याहतपणे ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. अशा ज्ञानसमृद्ध विद्यापीठांमुळेच भारत महासत्ता बनू शकतो, असे प्रतिपादन केंद्र सरकारच्या उन्नत भारत अभियानचे अध्यक्ष आणि नालंदा विद्यापीठाचे कुलपती शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी केले.
कराड येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या ६ व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख अतिथी या नात्याने ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा होते.
कराड येथे कृष्णा विद्यापीठाच्या सभागृहात हा दीक्षांत सोहळा रंगला. कृष्णा फार्मसी महाविद्यालयापासून सैन्यदलाच्या विशेष बॅन्डपथकाच्या मानवंदनेत प्रमुख पाहुण्यांना समारंभस्थळी नेण्यात आले. व्यासपीठावर कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ.सुरेश भोसले, कृष्णा विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ.सौ. नीलिमा मलिक, व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य विनायक भोसले, कुलसचिव डॉ. एम. व्ही.घोरपडे, परीक्षा नियंत्रक डॉ. सौ. आर. के. गावकर, वित्त अधिकारी पी. डी. जॉन, संशोधक संचालक डॉ. अरूण रिसबुड, दिलीप पाटील, सौ. मनिषा मेघे, सविता राम, डॉ. डी. के. अगरवाल, डॉ. दिपक टेंमे, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए.वाय. क्षीरसागर, मेडिकल अॅडमिनिस्ट्रेटर डॉ.आर. जी. नानिवडेकर, वैद्यकीय विज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एस. टी. मोहिते, दंतविज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. शशिकिरण एन. डी.,फिजिओथेरपीचे अधिष्ठाता डॉ. जी. वरदराजुलु,नर्सिंग विज्ञानच्या अधिष्ठाता प्राचार्या डॉ. वैशाली मोहिते, अलाईड सायन्सचे अधिष्ठाता डॉ. एस. सी.काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात विद्यापीठातील ५०१ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. तसेच प्रमुख पाहुणे डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते विविध अधिविभागात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या विद्यार्थ्यांना विशेष पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
कृष्णा विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करताना डॉ. भटकर म्हणाले, की कृष्णा विद्यापीठाला उत्तुंग भविष्य असून, कृष्णासारख्या विद्यापीठातून पदवी मिळविणे, ही विद्यार्थ्यांसाठी भाग्याची गोष्ट आहे. २१ वे शतक हे भारताचे आहे. अशावेळी आपण प्रत्येकाने सजग नागरिक म्हणून आपला कार्यव्याप सांभाळतानाच देशाच्या विकासाबद्दलही कटिबद्ध राहिले पाहिजे. सध्याच्या शैक्षणिक व्यवस्थेवर भाष्य करताना ते म्हणाले, की आम्ही अन्य परदेशी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमाला आदर्श मानून, त्यांच्या अभ्यासक्रमांची येथे अंमलबजावणी करत आहोत. पण मुळात भारत हा ज्ञानाच्या बाबतीत समृद्ध असून, ज्ञानाधिष्ठित शिक्षणव्यवस्था निर्माण करण्यासाठी सर्वप्रकारच्या संशोधनाला चालना देण्याची गरज आहे. सर्वप्रकारच्या विद्याशाखांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंबही आवश्यक असून, येत्या काळात वैद्यकीय क्षेत्रातही सर्व तंत्रज्ञानाने युक्त तसेच सर्व प्रकारच्या वैद्यकीय तपासण्यांसाठीही अत्याधुनिक मोबाईल उपयुक्त ठरू शकेल, असे भाकीत त्यांनी केले. सध्या जगात भारत हा तिसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणारा देश असून, त्याला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी ज्ञानसमृद्धतेला प्राधान्य देण्याची गरज आहे. तसेच विद्यार्थ्यांनी मानवता श्रेष्ठ मानून, सर्व ज्ञानशाखा समजून घ्यायला हव्यात, असेही त्यांनी नमूद केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलपती डॉ.वेदप्रकाश मिश्रा म्हणाले, की यश हे अपघाताने मिळत नाही, तर त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. त्यामुळे पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय्यनिश्चिती, कामाप्रती निष्ठा, कृतीशीलता यांना महत्व द्यायला हवे.. कृष्णा विद्यापीठातून पदवी घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रात मानबिंदू निर्माण करून देशाच्या विकासाला हातभार लावतील, याची मला खात्री आहे.
कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की स्पर्धेसाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याबरोबरच चारित्र्यसंपन्न समाज घडविणे, हे शिक्षणाचे उद्दिष्ट असते. शिक्षणाचे हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न कृष्णा विद्यापीठ सदोदीत करत आहे. सर्वोत्कृष्ट आरोग्य शिक्षण व आरोग्य सेवा देणारे कृष्णा विद्यापीठ हे दक्षिण महाराष्ट्रातील एकमेव वैद्यकीय केंद्र असून, कृष्णा विद्यापीठ संशोधन संस्कृतीला नेहमीच चालना देण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या सोहळ्याला कृष्णा सरिता बझारच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले, सिद्धार्थ घाटगे, डॉ. सुप्रिया पाटील, डॉ. रेणुका पवार, प्रा. शीतल सॅम्सन, डॉ.पूविष्णूदेवी, प्रा. स्नेहल मसूरकर आदींसह विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, पालक, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अमरनाथ चव्हाण सुवर्णपदकाचा मानकरी
एमबीबीएस अधिविभागातील अमरनाथ सर्जेराव चव्हाण या विद्यार्थ्याने सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्याला प्रदान करण्यात येणारे स्व. जयवंतराव भोसले स्मृती सुवर्णपदक व स्व. गोविंद विनायक अयाचित स्मृती सुवर्णपदक या दोन सुवर्णपदकांसह डॉ. आर. एस.कोप स्मृती पुरस्कार पकटाविला. तर सर्वोत्कृष्ट विद्यार्थीनीसाठी दिले जाणारे डॉ. एम. एस. कंटक अॅवार्ड तसेच यू.एस.व्ही. सुवर्णपदक आणि डॉ.व्ही. के. किर्लोस्कर पुरस्कार असे तीन विविध पुरस्कार श्रुती श्रीनिवास नायर हिने पटकाविले.तसेच डॉ. कुशल बांगर यांनी यू.एस.व्ही. पदक व डॉ. केशवराव गोरे देशमुख पुरस्कार, रिया दाश हिने डॉ. राणे पुरस्कार व श्रीमती इंदुमती दळवी पुरस्कार, तसेच स्वप्निल शिंदे, डॉ. श्रीकांत ओहरी,डॉ. हीना शाह यांनीही विविध पारिताषिके पटकाविली. विजेत्यांना शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.
कृष्णा विद्यापीठ जगात एक नंबरचे विद्यापीठ होईल : डॉ. भटकर
कराडसारख्या ग्रामीण भागात कार्यरत असणार्या कृष्णा अभिमत विद्यापीठाने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय दर्जाची मानांकने प्राप्त केली आहे. आज या विद्यापीठात केवळ भारतीयच नव्हे तर परदेशातील विद्यार्थीही शिक्षण घेत असून, कृष्णा विद्यापीठ लवकरच देशातच नव्हे तर जगात एक नंबरचे विद्यापीठ होईल, याची मला खात्री आहे, असे गौरवोद्गार शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी यावेळी काढले