जोतिबा डोंगर येथे चोपडाईदेवी षष्ठी यात्रा उत्साहात साजरी
कोडोली प्रतिनिधी :
आज श्रावणषष्ठी निमित्त जोतिबा डोंगर येथे चोपडाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. या यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक वाडी रत्नागिरी, जोतिबा डोंगर येथे दाखल झाले आहेत.उ द्या सकाळी या यात्रेची सांगता होणार आहे.
आज श्रावणषष्ठी निमित्त जोतिबा डोंगरावर चोपडाई देवीची यात्रा भरली आहे. श्रावणषष्ठी दिवशी देवींने रत्नासुराचा वध केला, अशी आख्यायिका आहे. म्हणून श्रावणषष्ठीला जोतिबा डोंगरावर चोपडाई देवीची यात्रा भरते. त्या युद्धानंतर देवीला प्रचंड दाह झाला, आणि तो दाह शांत करण्यासाठी देवीला लिंबू , दुर्वा आणि बेलपत्र अर्पण करण्यात आले, म्हणून या यात्रेनिमित्त देवीची पूजा, दाहकता शांत करणाऱ्या लिंबू, दुर्वा आणि बेल अशा वनस्पती मध्ये बांधण्यात आली आहे.
आज पहाटे पासून मंदिरामध्ये धूप आरती अखंड प्रजवलीत केली गेली होती. भाविक आज षष्ठीचा उपवास करतात. हा उपवास उद्या सकाळी देवीला पूरण पोळीचा नैवेद्य अर्पण करून सॊडला जातो. षष्ठीच्या यात्रेला येणारे भाविक मंदिरातून श्रीफळ, राखणेचा नारळ म्हणून घरी नेतात. या यात्रेसाठी राज्य भरातून साधारणपणे २ लाख भाविक जोतिबा डोंगरावर येतात. यात्रा सुरळीत पार पडावी म्हणून, कोडोली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. तसेच जिल्हा प्रशासनाच्यावतीने हि विशेष दक्षता घेण्यात आली आहे. या यात्रेची सांगता उद्या दि.२९ जुलै रोजी सकाळी होणार आहे. तसेच आज रात्रभर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले रहाणार आहे.