सरुडात दोन चिमुकल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू
बांबवडे : सरूड तालुका शाहुवाडी इथं शेतात खेळत असताना दोन लहानग्या सख्ख्या भावांचा विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला आहे. त्यापैकी विराज मानसिंग पाटील (वय ८ वर्षे ) याला गटांगळ्या खाताना विहिरीतून बाहेर काढले.पण उपचारार्थ नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. तर त्याचा भाऊ ऋषिकेश मानसिंग पाटील (वय ११ वर्षे ),याचे प्रेत अजून मिळाले नाही. सदर घटनेची शाहुवाडी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली हकीकत अशी कि, शिवाजी विठू पाटील दोन्ही मुलांचे आजोबा आपल्या शेतात भांगलन करीत होते. दरम्यान ऋषिकेश आणि विराज हे दोघेही आपल्या आजोबांजवळ शेतात आले. मोकळ्या जागेत खेळत असताना, अनवधनाने जवळच असलेल्या विहिरीत पडले. विहिरीला कठडा नसल्याने, ते थेट पाण्यातच गेले.बुडत असताना दोघांनी आरडा-ओरडा केला. त्याचवेळी आजोबा विहिरीकडे गेले, त्यावेळी विराज गटांगळ्या खात होता.त्याच्या आजोबांनी विराजला बाहेर काढले, व उपचारार्थ खाजगी दवाखान्यात नेले.पण त्या अगोदरच त्याचा मृत्यू झाला होता. तर ऋषिकेश चे प्रेत रात्री उशिरापर्यंत सापडले नाही. त्याचा शोध घेण्याकरिता कोल्हापूर हून जीवनज्योती च्या जवानांना बोलविण्यात आले,परंतु विहिरीत पाणी स्त्रोत अधिक असल्याने त्याचे शव मिळाले नाही.
विराज चे प्रेत शव विच्छेदन करण्याकरिता बांबवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. सदर घटनेची फिर्याद शिवाजी विठू पाटील यांनी शाहुवाडी पोलिसात दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील, एस.डी.अपराध, एस.डी. पाटील, व्ही.एस. चिले पोलीस कर्मचारी करीत आहेत. या घटनेने सरूड पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.