शिराळ्यातील चिंचोलीच्या पै.राकेश जाधवला सुवर्णपदक
सोंडोली (प्रतिनिधी ):
भारतीय सेना दलामार्फत आम्बाला (हरयाणा) यॆथॆ आर्मी फॉरमेशन रेसलिंग चॅम्पियनशीप 2017 पार पडली. या स्पर्धेत अनेक चटकदार कुस्त्या झाल्या. हि स्पर्धा आंतरराष्ट्रीय कुस्ती नियमानुसार पार पडली. स्पर्धा फ्री स्टाईल आणि ग्रिको रोमन दोन्ही प्रकारात घेण्यात आली. सर्वच सेना मल्लांनी उत्कृष्ट खेळी केली. या स्पर्धेत चिंचोली..ता.शिराळा येथील राकेश जाधव यांनी एकतर्फा विजय मिळवत सुवर्ण पदक पटकावले.
57 किलो फ्रि स्टाईल वजन गटात पै. राकेश जाधव यांनी, पहिल्याच फेरीच्या सातव्या सेकंदाला प्रतिस्पर्धी मल्लाचा चपळाईने एकेरी पट काढून कब्जा घेऊन दोन गुणांची कमाई केली. सामन्यावर पकड मजबूत करत एक मिनिट दहा सेकंदाने पुन्हा दुहेरी पटाची पकड घेऊन दोन गुणांची कमाई केली. कुस्ती उठवून पुन्हा सुरू करण्यात आली. लगेच राकेश ने बाहेरील ढाक लावून चार गुण मिळवत प्रतिस्पर्ध्याला डेंजर पोझिशनला नेले, आणि दोन गुण कमावत टेक्निकल फॉल द्वारे एकतर्फा विजय मिळवुन सामन्यात सुवर्ण पदक प्राप्त केले. यानंतर त्याची पुढील सामन्यासाठी निवड झाली आहे. तो कुस्तीमल्लविद्या शिराळा तालुका प्रमुख पै.राहुल जाधव यांचा लहान बंधु आहॆ. सध्या तो मथुरा या ठिकाणी भारतीय सॆनादलात कार्यरत आहॆ. पै.राकेश जाधव यांचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.