सावित्री महिला संस्थेची तीन कोटी रुपयांची उलाढाल
कोडोली प्रतिनिधी :-
सावित्री महिला औद्योगिक सहकारी संस्थेची चालू वर्षात तीन कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल झाली असून, संस्थेस अहवाल सालात दोन लाख रुपयांचा नफा झाल्याची माहिती, अध्यक्षा सौ शुभलक्ष्मी कोरे यांनी ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना दिली.
तात्यासाहेब कोरे नगर ता.पन्हाळा येथील श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या कार्यस्थळावर सावित्री महिला संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती.
संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. सभासदांनी संचालक मंडळावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व सभासदांचे आभार व्यक्त करण्यात आले. संस्थेचे भागभांडवल ७५ लाख रुपये जमा झाले असून, संस्थेकडे १५६५ महिला सभासद आहेत. संस्थेस लेखा परीक्षण अहवालात ‘ अ ‘ श्रेणी मिळाली असल्याचे सौ शुभलक्ष्मी कोरे यांनी यावेळी सांगितले.
वारणा दूध संघाचे कर्मचारी असलेल्याच्या पत्नी व आई या संस्थेच्या सभासद आहेत. कर्मचाऱ्याच्या प्रगतीस हातभार लागावा, हा उदात्त हेतू समोर ठेवून या संस्थेची स्थापना सन १९८५ रोजी केली आहे. संस्थेच्या माध्यमातून अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना हातभार लागला आहे. संस्था वारणा दूध संघास श्रीखंड व दही पॅकिंग करण्यासाठी लागणारे पॅकिंग मटेरियल आपण तयार करतो जुलै व ऑगस्ट २०१७ या दोन महिन्यांत ५५ लाख रुपयांचे पॅकिंग मटेरियल वारणा दूध संघास पुरवठा केला आहे. दूध संघाला सर्वच लागणारे पॅकिंग मटेरियल ची ऑर्डर सावित्री महिला संस्थेस मिळवण्याचा मानस असल्याचे वारणा साखर कारखान्याच्या अध्यक्षा व संस्थेच्या मार्गदर्शक तज्ञ संचालिका श्रीमती शोभाताई कोरे यांनी यावेळी व्यक्त केला.
वारणा दूध संघ अडचणीत आल्यावर सावित्री महिला संस्था देखील अडचणीत आहे, अशी टीका सर्वत्र ऐकायला येत होती. वारणा समूहाचे नेते दूध संघाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांच्या नियोजनाखाली वारणा दूध संघ अडचणीतून बाहेर पडत, या वर्षी १६ कोटी रुपयांचे फरक बिल दीपावलीसाठी देण्यात येणार आहे. तसेच मार्गदर्शक श्रीमती शोभाताई कोरे संस्थेच्या अध्यक्षा सौ. शुभलक्ष्मी कोरे यांच्या सुयोग्य पद्धतीने केलेल्या व्यवस्थापनामुळे सावित्री महिला संस्थाही अडचणीतून बाहेर पडून, या संस्थेने दोन लाख रुपयांचा नफा मिळवला आहे. त्यामुळे टीकाकारांना ही चांगलीच चपराक बसली असल्याचे, वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी यावेळी सांगितले.
सभेस सहकार व स्वागतगीताने प्रारंभ करण्यात आला. अहवाल सालात देशातील सर्व क्षेत्रातील दिवंगत झालेल्या मान्यवरांना, तसेच संस्थेच्या सभासद कर्मचारी यांना श्रद्धांजली वाहणारा दुखवट्याचा ठराव निमंत्रित संचालिका सौ. विद्या कुलकर्णी यांनी मांडला. सभेची नोटीस वाचन मोहन जाधव यांनी केले. वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष डॉ.भाऊसाहेब गुळवणी, पर्सोनल व्यवस्थापक बी.बी.चौगुले, जनसंपर्क अधिकारी पी. व्ही.कुलकर्णी, वारणा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ्. सुरेखा शहापुरे, वारणा महिला पतसंस्था वारणा भगिनी मंडळाच्या संचालिका यांच्यासह संस्थेच्या सर्व संचालक सभासद व भगिनी मोठ्या संखेने उपस्थित होत्या.
संस्थेस कायम पणे सहकार्य करीत असलेल्या श्री वारणा सहकारी दूध संघाचे संचालक मंडळ, तसेच संस्थेला मदत करणाऱ्या सर्व घटकांबरोबरच सभेला उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवरांचे आभार,. संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. मुग्धा येडूरकर यांनी मानले व सौ. शीतल बसरे यांनी सूत्रसंचालन केले.