गड तटांनो या, कड्या कपारींनो या, सह्याद्रीच्या या ” वाघाला ” सलाम करण्यासाठी या…
बांबवडे : शाहुवाडीच्या मातीला बलिदानाची परंपरा आहे, तर सह्याद्रीच्या कड्या कपारींची कणखरता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली हि धरणी, नेहमीच भारतमातेच्या रक्षणासाठी आपल्या हृदयातील एक ,एक हिरा इरेला घालत आहे.
याच परंपरेला उजाळा मिळालाय, तो शाहुवाडी तालुक्यातील गोगवे गावचे सुपुत्र शहीद श्रावण माने यांच्या वीरमरणाने. या वीराने पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना, त्यांचा एक तरी गनीम मातीत मिळवत दिले आहे. या तालुक्यातील अनेक जवान देश रक्षणार्थ तैनात आहेत. शहीद श्रावण माने यांचं शिक्षण येथील शामराव पाटील विद्यालयात झालं आहे. इथल्या विद्यामंदिराने आपल्या बागेत फुलवलेलं फुल भारतमातेच्या चरणी अर्पण केलं आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. याही पुढे जावून निवृत्त सैनिक बाळकू श्रीपती माने यांच्या घराने तर देशाच्या रक्षणासाठी आपली पिढी दिली आहे. श्रावण माने यांचे वडील बाळकू माने हे स्वतः सैन्यात होते. त्यांचा थोरला चिरंजीव सागर माने हे देखील सैन्यात सेवा बजावत आहेत. तर श्रावण माने हे तर सीमेवर सेवा बजावत होते. गेल्या चार वर्षापूर्वी सैन्यात दाखल होवून आपल्या घराण्याची परंपरा त्यांनी अखंडित ठेवली .
सरते शेवटी या गावच्या मातीने, आपल्या पदारातील समिधा श्रावण यांच्या रूपाने भारतमातेच्या रक्षणासाठी अर्पित केल्या.
त्या घराला सलाम, ज्या घराने देशभक्तीचे संस्कार आपल्या पिढीवर केले…
त्या विद्यामंदिराला सलाम, ज्याने आपल्या अंगणात वाढवलेले पुष्प, देशभक्तीच्या सुगंधासाठी अर्पण केले…
त्या मातीला सलाम, जिने आपल्या अंगाखांद्यावर असल्या निधड्या छातीच्या वाघाला खेळवले…
त्या मातेला सलाम जिने अशा वाघाला जन्म देवून देशसेवेला धाडले …
गड तटांनो या, कड्या कापरींनो या, सह्याद्रीच्या या ” वाघाला ” सलाम करण्यासाठी या…