कारभाऱ्यांनी कारभारणीला कर्तुत्वाची संधी द्यावी – मा. आम.सत्यजित पाटील सरुडकर
मलकापूर प्रतिनिधी : पदाधिकारी महिलांच्या कारभाऱ्यांनी त्यांच्या कारभारणी ला कारभार करू द्यावा, त्या ठिकाणी आपण कारभार न करता, त्यांना संधी द्यावी, तरच खऱ्या अर्थाने महिलादिन साजरा केला जाईल, असे मत माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी व्यक्त केले.

कडवे पैकी वाणी पेठ येथील मारुती मंदिरात महिला दिनाचे औचित्य साधून, हळदी कुंकू समारंभ सोबत महिलांसाठी तसेच ग्रामस्थांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व विजयराव खोत युवा मंच यांच्यावतीने या कार्यक्रमाचे करण्यात आले होते. यावेळी शाहुवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने महिलांना आरोग्यविषयक माहिती देण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

यावेळी आयोजकांनी उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार केला.

यावेळी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. रुपाली संजय खोत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर प्रास्ताविक सभापती विजयराव खोत यांनी केले.

यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील पुढे म्हणाले कि, शासनाने ५० टक्के महिलांना आरक्षण देवून सुद्धा त्यामध्ये पुरुष वर्ग अतिक्रमण करीत आहे. या देशाने अनेक वीरांगणा दिल्या आहेत. शिक्षणाच्या अध्वर्यू सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, अहिल्यादेवी अशा अनेक महिलांनी देशाच्या प्रगतीत आपले योगदान दिले आहे. तेंव्हा कारभाऱ्यांनी स्वत: बाजूला सरकून जिथे त्यांचे आरक्षण आहे, तिथे त्यांना कर्तुत्व दाखवण्याची संधी द्यावी, असे आवाहन सत्यजित पाटील यांनी केले.

यावेळी परळे-निनाई च्या डॉ. नीलिमा काटकर यांनी महिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांसह, प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूर च्या डॉक्टरांची टीम उपस्थित होती.

यावेळी उदयसिंग खोत, शाहुवाडी तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मुकुंद पवार, विद्यमान अध्यक्ष संतोष कुंभार, उपाध्यक्ष रमेश डोंगरे, चंद्रकांत शेळके, राजू कांबळे, दशरथ खुटाळे आदी पत्रकारांसाहित अमरसिंह पाटील, दत्ता पोवार तालुका प्रमुख, योगेश कुलकर्णी, संजय खोत,आदी मान्यवरांसह ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.,