सामाजिक

बेमुर्वत वनविभागाला जाब कोण विचारणार ? : सर्वसामान्य जनता बळी पडतेय हिंस्त्र श्वापदाच्या हल्ल्यात …

शित्तूर – वारुण ता.3 ( शिवाजी नांगरे ) शित्तूर – वारुण परिसरात अजूनही बिबट्याचे हल्ले सुरूच आहेत. येथील ढवळेवाडी येथील सुषमा ढवळे ही विध्यार्थीनी दैव बलवत्तर म्हणून वाचली, तिच्यावर होणारा हल्ला शेळीवर झाला, त्यात शेळी गंभीर जखमी झाली. मानवी वस्तीत भरदिवसा चार – चार बिबट्यांचा मुक्त संचार लोकांनी प्रत्यक्षात बघितला. घराच्या अंगणात आणि वळचनीला रात्रभर बिबट्यांचे वास्तव्य होते. येथील नागरिकांनी भीतीपोटी रात्रभर अंधारात मुले – बाळे पोटाशी धरून गस्त घातली. एकीकडे घटनास्थळी तहसीलदार रामलिंग चव्हाण आपले कर्तव्य म्हणून भेट देत आहेत, तर दुसरीकडे वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कळवून सुद्धा कोणीही घटनास्थळाकडे फिरकलं सुद्धा नाही. वनविभागाची हि बेमुर्वतखोरी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. या बेजबाबदार अधिकाऱ्यांना कोण जाब विचारणार आहे का ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. दरम्यान शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी ढवळेवाडी वर भेट देवून, लोकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.


चांदोली राष्ट्रीय उद्याना लगत असणाऱ्या शित्तूर,- वारुण परिसरातील वाडया – वस्त्यांना आणि आजू – बाजूच्या गावांना येथील मुक्त सोडलेल्या हिंस्त्र श्वापदांचा होणारा त्रास हा नित्याचाच विषय झाला आहे. बिबटयाच्या हल्ल्यात वर्षभरात दोन चिमुकल्या मुलींना जीव गमवावा लागला आहे. 20 नोव्हेंबर 2023 रोजी तळीचावाडा येथील सारिका बबन गावडे या आठ वर्षीय शाळकरी मुलीचा बिबट्याने झडप घालून जागीच मृत्यू झाला. सदरची घटना ताजी असतानाच ढवळेवाडी येथील सुषमा राजाराम ढवळे ही 19 वर्षीय मुलगी आपल्या घराशेजारीच शेळ्या चारत होती. त्याचवेळी तिच्यावर हल्ला करण्यासाठी तिच्याच दिशेने चवताळून येणाऱ्या बिबट्याला आरडा – ओरड करून तिने हुसकावून लावले, तरीपण त्याने तिच्या शेळीचा झडप घालून गळा घरून गंभीर जखमी केले. कदाचित ति मुलगी लहानगी असती, तर त्याठिकाणी नक्कीच तळीच्या वाड्याची आणि केदारलिंग वाडी येथील घटनेची पुनरावृत्ती झालीच असती. तसेच रात्री गस्त घालत असताना तुषार ढवळे या 20 वर्षीय युवकावरही बिबटयाने चाल केली, पण तो पळत असताना पडला आणि पायाला गंभीर दुखापत होऊन जखमी झाला आहे.असे प्रत्यक्षदर्शी आणि घटनास्थळावरून सांगण्यात आले.


लोकांच्या जीवन – मरणाचा प्रश्न निर्माण झाला, तरीही वनविभाग अधिकारी आणि कर्मचारी इतके सुस्त का? त्यांच्या कामाला यश का येत नाही? दोन्हीही घटनेत त्यांना नरभक्षी बिबट्या का सापडला नाही? असे एक ना अनेक प्रश्न अजून अनुत्तरितच आहेत. 20 लोकांची रेस्क्यू टीम, रेस्क्यू व्हॅन, आठ ट्रॅप कॅमेरे, पिंजरे, ड्रोन कॅमेरा एवढ्या सगळ्या यंत्रणा असूनही एक बिबट्या सापडत नाही? हे म्हणजे सामान्य लोकांना न उलगडणार कोडंच आहे? पण स्थानिक रहिवाश्यांना मात्र कधी केळीचा डबरा नावाच्या रानात, तर कधी अंगणात दिवसातून दोन – तीन वेळा तरी दिसून येतोय. हे कसं काय? याचाही विचार करायला हवा. तळीचा वाडा येथील घटना घडून 12 ते 13 दिवस उलटून गेले असतानाही वनविभागाकडून कोणतीच कार्यवाही होत नाही म्हटल्यावर त्यांच्या सुस्त, बेजबादार कार्यपद्धतीवरच प्रशचिन्ह उभे राहतेय.


लोकांना उडवा – उडवीची उत्तरे देणे, उर्मट बोलणे, पदाचा धाक दाखवून धमकावणे असे वर्तन वनविभागातील कर्मचारी वर्गाचे स्थानिक लोकांशी असल्याचे बोलले जात आहे. लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने सुद्धा हे बिबट्या जे्रबंद करण्याचे काम करणे सुलभ झाले असते, पण घटना स्थळी गेल्यावर निदर्शनास आलेली परिस्थिती काय वेगळीच होती. तिथे ना रेस्क्यू टीम, ना ट्रॅप केमेरे, ना ड्रोन कॅमेरा, फक्त पिंजरा लावून एका झाडाखाली सावलीत बसलेले 3 कर्मचारी बस्स एवढच! मग बिबट्या पकडतोय असा वनविभाग फक्त फार्स करतोय? लोकांची आणि प्रशासन यांची दिशाभूल करतोय? असे प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीत. वनविभागाला लोकांचे जीव घेणारे हिंस्त्र प्राणी जेरबंद करायचेच नाहीत,

याउलट त्या प्राण्यांना सुरक्षित कस ठेवता येईल याचेच नियोजन करण्यात ते व्यस्त आहेत. याचाच अर्थ इथल्या कितीही लोकांचा बळी गेला तरी हरकत नाही आम्ही मदत देतोय! पण, पर्यटनासाठी जंगली प्राणी मात्र सुरक्षितपणे जगला पाहिजे! हेच धोरण वनविभाग राबवत असल्याचे दिसून येतेय. वारंवार घडणाऱ्या घटनामुळे इथले स्थानिक भीतीच्या छायेखाली आहेत.प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालून सदरच्या त्रासातून लोकांची कायमची मुक्तता करणे गरजेचे आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!