आपल्याच सावत्र मुलींचे अपहरण करणाऱ्या महिलेस अटक
शिराळा (प्रतिनिधी ) :बांबवडे तालुका शिराळा येथील तीन सावत्र मुलींच्या अपहरण प्रकरणी विद्या मानसिंग धुमाळ ( वय ३५ वर्षे )या महिलेस शिराळा पोलिसांनी अटक केली आहे. तिचे मुळचे नाव विद्या रघुनाथ गायकवाड असून ती लातूर येथील रहाणारी आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ,सदरच्या तीन मुलींसह त्या महिलेस हातकनंगले येथून अटक करून शिराळा इथं आणण्यात आले. ५ मार्च रोजी आपल्या तिसऱ्या पत्नीने पहिल्या पत्नीच्या तीन मुलींना पळवून नेले असल्याची फिर्याद मानसिंग धुमाळ यांनी शिराळा पोलीस ठाण्यात दिली होती.
याबाबत समजलेली माहिती अशी कि, मानसिंग यांच्या पहिल्या पत्नीस स्नेहल (वय १६ वर्षे), तृप्ती (वय १४ वर्षे ), श्रेया (वय ११ वर्षे )अशा तीन मुली आहेत. मानसिंग यांची पहिली पत्नी मुंबई ला गेल्यापासून तिने घरच्यांशी संबंध ठेवले नाहीत. त्यानंतर दुसरी पत्नी जास्त दिवस नांदली नाही. मानसिंग यांची मावशी इस्लामपूर इथं केळी विक्रीचा व्यवसाय करते. त्यांच्याकडे डिसेंबर २०१६ मध्ये विद्या आली. आपण एकटीच असून आपल्याला कुणाचे पाठबळ नसल्याचे तीने मावशीस सांगितले. त्यावेळी मावशी आशाताई कांबळे यांनी माझ्या बहिणीच्या मुलाबरोबर लग्न करशील का ? म्हणून विद्याला विचारले . त्यावेळी मानसिंग यांचा विद्याशी डिसेंबर २०१६ मध्ये विवाह झाला. यावेळी तिने आपण लातूर चे असल्याचे सांगितले. त्यानंतर विद्याने घरातील सासरे हिंदुराव धुमाळ, सासू यशोदा ,पती व तीन मुलींचा विश्वास संपादन करून संसार करू लागली. बुधवार दि . ५ एप्रिल रोजी दुपारच्या दरम्यान सासू व सासरे बांबू तोडण्यासाठी रानात गेले होते. नवरा मानसिंग पेट्रोल पंपावर कामास असल्याने कासेगाव इथं गेले होते. त्यावेळी तीन मुली व विद्या घरी होत्या. विद्या तीन मुलींना घेवून घराबाहेर गेली, ती परत आलीच नाही. त्यामुळे मानसिंग यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली होती. शिराळा पोलिसांनी विविध ठिकाणी चौकशी केली, पण ती कुठे आढळून आली नाही. त्यानंतर ती मिरज रेल्वेस्थानकावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. परंतु पोलीस मिरज रेल्वे स्थानकावर पोहचण्या अगोदर ती कोल्हापूरला निघून गेली होती. ती तीन मुलींसह रेल्वे स्थानकावर आली असल्याचे सीसी टीव्ही कॅमेऱ्यात आढळून आली होती. आठ ते दहा दिवसापूर्वी विद्याचे पहिले पती शिराळा पोलिसात आले होते. त्यावेळी ती हातकनंगले इथं असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तत्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे, प्रभाकर गायखे , आक्काताई नलवडे, गणेश झांजरे , शशिकांत माने यांनी हातकनंगले इथं जावून भाड्याने रहात असलेल्या, विद्याला तीन मुलींसह ताब्यात घेवून शिराळा इथं आले. विद्याचे या अगोदर आठ ते नऊ विवाह झाल्याचे पोलीस तपासात आढळून येत आहे.