‘अथणी ‘ चा तोंड दाबून बुक्क्यांचा मार
बांबवडे : ‘ अथणी ‘ च्या कारभाऱ्यांचा इथल्या स्थानिक कर्मचारी वर्गाला तोंड दाबून बुक्क्यांचा मार देण्याचा कारभार सुरु आहे. या कारभाराबाबत कुणीही काहीही बोलत नाही ,याचे कारण हा कारखाना म्हणजे, ह्या तालुक्याचे औद्यीगिक स्वप्न आहे, परंतु याचा गैरफायदा या कारभाऱ्यांनी घेवू नये. अन्यथा इथला शेतकरी आणि कष्टकरी वर्ग पेटून उठल्याशिवाय राहणार नाही.
माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड सह. साखर कारखाना मर्या. सोनवडे-बांबवडे हे औद्योगिक पर्व ह्या तालुक्याचे भव्य दिव्य स्वप्न आहे. हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी इथले चेअरमन आणि संचालक मंडळ जीवाचे रान करीत आहेत. ह्यासाठीच त्यांनी ‘अथणी शुगर्स ‘ ला हा कारखाना चालवण्यास दिला आहे. परंतु या कारखान्याच्या आर्थिक अडचणीचा गैरफायदा घेवून, इथल्या कर्मचारी वर्गाला अथणी ला कामास पाठविले जात आहे, तसेच ६० ते ७० किलोमीटर अंतरावर इथल्या कर्मचाऱ्याला पाठविले जात आहे. कर्मचारी सुद्धा कामास जातात, कारण आपला कारखाना अडचणीत आहे, हि आपुलकीची भावना त्यांच्यामध्ये आहे. परंतु याच गोष्टींचा ‘ अथणी ‘ वाल्यांनी गैरफायदा घेतल्यास, त्यावर उत्तर देखील शोधता येवू शकते. कारखान्यात सुरु असलेली मानसिक दडपशाही कर्मचारी वर्ग बोलत नाही, हे त्यांचे मानसिंग दादांवर असलेले प्रेम आहे. तुम्हा मंडळींच्या दबावाला ती बळी पडणारी नाहीत. तेंव्हा अधिक ताणातणी न करता इथल्या कर्मचारी वर्गाला इथंच काम करू द्या. तुमच्या ‘अथणी ‘ ला नेवून काम लावू नका,अन्यथा या तुमच्या भांडवली दडपशाही ला उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही.