‘ मुख्यमंत्र्यांना हमीपत्र पोहोचण्या अगोदरच तरुणाची आत्महत्त्या ‘
कोल्हापूर : स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्यास, शेतकरी आत्महत्त्या करणार नाही, असे हमीपत्र मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी तयार केले होते, पण त्या अगोदरच उस्मानाबाद जिल्ह्यातील एका तरुणाने शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्त्या केलीय. ही घटना आहे, उस्मानाबाद जिल्ह्यातील खामसवाडी या गावातील .
याबाबत सविस्तर हकीकत अशी कि, संदीप बलभीम शेळके ( वय २२ वर्षे ) असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. संदीप च्या वडिलांच्या नावे १ हेक्टर ३ आर शेती असून, त्यांच्यावर २ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज आहे. संदीप चा मोठा भाऊ पोलिओ मुळे अपंग आहे. त्यामुळे संदीप आपल्या वडिलांबरोबर शेती करायचा. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने, संदीपने आत्महत्या केल्याचे समजत आहे.
दरम्यान संपाला सुरुवात झाल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्त्या करणार नाही, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हमीपत्र देण्यासाठी विशेष मोहीम राबविली होती. यासाठी खामसवाडी गावातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी तब्बल एक किलोमीटर लांबीचे पत्र लिहिले होते. यावर अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या होत्या. हे हमीपत्र मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचण्या अगोदरच संदीप ने आत्महत्या केलीय.
त्यामुळे शेतकरी कर्जमाफी आणि आत्महत्या सत्र वेगळ्या दिशेला निघालेचे निदर्शनास येत आहे.