कर्जमाफी हा केवळ स्टंट च आहे का ?
बांबवडे : महाराष्ट्रात झालेल्या ऐतिहासिक शेतकरी संपामुळे राजकारण ढवळून निघाले आहे, आणि आपल्या सत्तेच्या खुर्च्या जपण्यासाठी संबंधितांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली. पण हि कर्जमाफी जाहीर करत असतानाच ,तत्वतः , अटी अशा शाब्दिक कोट्या करीत , शेतकऱ्याला बांधून घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आणि हि कर्जमाफी करून आपण फर मोठे उपकार करत आहोत ,असंच दर्शवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
संपूर्ण देशाला पोसणारा शेतकरी संपावर जातो, त्याचे प्राथमिक उदाहरण पाहिल्यानंतर शासनाला सुचलेले हे शहाणपण आहे. शेतकऱ्याला कर्जमाफी देताना, आणि खरीप हंगामासाठी कर्ज देताना , अनेक निकष लावले गेलेले आहेत. यामुळे शेतकऱ्याला कर्जाचा रुपाया मिळू नये ,अशी व्यवस्था करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
शेतकऱ्याचा मूळ धंदा शेती आहे. ती शेती परवडत नाही, म्हणून तो जर इतर व्यवसाय करून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले कुटुंब सावरण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्यात चूक ती काय ? असा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नाही. याचा अर्थ शेतकऱ्याने फक्त शेतीच करावी,आणि कर्ज फेडावे. कर्ज फिटत नसेल ,तर आत्महत्या करावी, असंच शासनाला वाटतंय का? शेतीतून कर्ज फिटत नाही, म्हणून तो जर प्रामाणिकपणे हातपाय हलवण्याचा प्रयत्न करत असेल तर ,आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असेल तर ती त्याची चूक आहे का ?,कि केवळ शेती करूनच कर्ज फेडायचं,आणि फिटत नसेल तर आत्महत्या करायची एवढाच पर्याय शासन शेतकऱ्यापुढे ठेवणार आहे का ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शासन होकारार्थी ठेवणार असेल, तर शेतकऱ्याने करायचे काय ?
शेतकऱ्याला दहा हजार रुपये खरीप हंगामासाठी कर्ज देण्याचे आश्वासन दिलेल्या उच्चाधिकार समिती ने आजपर्यंत एक रुपाया शेतकऱ्याला मिळू दिलेला नाही.हे वास्तव आहे.
त्यामुळे शेतकऱ्याची कर्जमाफी हा केवळ स्टंट च आहे, असे मानावे लागेल.