कर्जमाफी कोणाला ?
बांबवडे : बँकेच्या कर्ज व्यवस्थेतून बाहेर फेकल्या गेलेल्या राज्यातील सुमारे ३१ लाख थकबाकीदार शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी १० हजार रुपये अग्रिम कर्ज देण्यासाठी अनेक कठोर निकष राज्य सरकार ने बुधवारी जारी केले. या अग्रिम कर्जासाठी अपात्र शेतकरी कोण ,याची भलीमोठी यादी आहे. त्यासोबत कर्जमाफीचा लाभही कोणाला द्यायचा , त्यासाठीही याच पद्धतीने कठोर निकष ठेवले जाण्याची शक्यता आहे.
यामुळे नोकरदार शेतकरी तातडीच्या मदतीसाठी अपात्र ठरणार असून निम्म्याहून अधिक अर्जदार कर्ज कक्षेतून बाहेर जाणार आहेत. सरसकट कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला असला, तरी अंमलबजावणी कठीण असून त्यास बराच कालावधी लागणार आहे. कर्जमाफीचा लाभ सधन शेतकऱ्यांना घेता येवू नये, यासाठी कठोर निकष ठेवले जाणार असून ,हि समिती अजून निश्चित झालेली नाही. कर्जमाफीसंदर्भात बँकांशीही अजून पूर्ण चर्चा झालेली नाही व त्यांनी अजून अनुकुलता दाखवलेली नाही. या पार्श्वभूमीवर थकबाकीदार शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी १० हजार रुपये अग्रिम पीक कर्ज म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने आदेश जारी केले आहेत. बँकांकडून त्यांचे पालन होईल, आणि निकष ठेवले असले, तरी गरजू व गरीब शेतकऱ्यांना हि रक्कम उपलब्ध होईल, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. सहकार क्षेत्राला या निमित्ताने मोठा धक्का बसला आहे.
या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आता कर्जमाफी दिली जाणार नाही. …
बाजार समिती, सहकारी साखर कारखाने, सहकारी सुत गिरण्या, नागरी सहकारी बँका, जिल्हा सहकारी बँका, दुध संघ, मजूर संस्था यांच्या अध्यक्ष,उपाध्यक्ष,व संचालकांना कर्जमाफीतून वगळले जाणार आहे. सहकाराला हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
यांना कर्ज मिळणार नाही…
राज्यातील आजी,माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी-माजी खासदार, आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, महापालिका व पालिकांचे नगरसेवक, केंद्र व राज्य सरकार चे कर्मचारी, निवृत्तीवेतन धारक, डॉक्टर, वकील, लेखापरीक्षक,अभियंते, व्यावसायिक, नोंदणीकृत सेवा पुरवठादार, कंत्राटदार , ठेकेदार, ज्यांच्याकडे दुकान परवाना आहे, असे दुकानदार , चारचाकी वाहन असलेले मालक यांना या कर्जमाफीतून वगळण्यात आले आहे. विशेष म्हणजे यातील एखादीही व्यक्ती या संवर्गात मोडत असेल तर त्यांना १० हजार रुपयांचे कर्ज मिळणार नाही. त्यामुळे आता कर्जमाफीतून ही हे घटक पूर्णपणे वगळले जातील , हे स्पष्ट झाले आहे.