प्रियकराच्या मदतीने पतीचाच खून
शिराळा प्रतिनिधी : प्रियकराच्या संगनमताने पत्नीनेच आपल्या नवऱ्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. काही दिवसांपूर्वीच पावले वाडी खिंडीत एका अनोळखी पुरुष जातीचे प्रेत सापडले होते. याचा तपास करताना वरील घटना उघडकीस आली आहे.
निवृत्ती गोविंद शिंदे ( वय ४५ वर्षे )रहाणार घोगाव तालुका पलूस जी,सांगली असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याचा खून त्याचीच पत्नी अंजना निवृत्ती शिंदे ( वय ४० वर्षे ) हिने तिच्या प्रियकराच्या म्हणजे विकास सर्जेराव माळी (वय ४० वर्षे ), त्याचा चालक राजेंद्र हिंदुराव कांबळे (वय ५० वर्षे )या तिघांनी मिळून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या तिघानाही पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत शरद गोविंद शिंदे (वय २८ वर्षे )रहाणार घोगाव यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी कि, मयत निवृत्ती शिंदे, अंजना शिंदे, विकास माळी ,व राजेंद्र कांबळे हे एकाच मोटरसायकलवरून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.अधिक विचारणा केली असता सदरचा खून आपणच केल्याची कबुली या मंडळीनी दिली.
अधिक तपास करता, अंजना शिंदे हिने दि.२९ जुलै रोजी आपल्या पतीस निवृत्ती शिंदे याला आपला कान दुखत असल्याचे सांगितले,व आपण डॉक्टर कडे जावू या असे सांगितले, त्यावेळी तिने निवृत्तीला चहा दिला. पण त्या चहामध्ये गुंगीच्या गोळ्या टाकल्या. तशा अवस्थेतच ते दोघे दुचाकीवरून डॉक्टर कडे निघाले.दुचाकीवरून जात असताना साखराळे जवळील खुंदलापूर वसाहतीजवळ अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली.त्यामुळे निवृत्तीच्या गुडघ्याला दुखापत झाली.दरम्यान पाठीमागून मोटरसायकल क्र.एम एच १० बी क्यू १५४७ वरून अंजनाचा प्रियकर विकास माळी व राजेंद्र कांबळे आले.आपण दवाखान्यात जावू असे सांगून निवृत्ती अंजना तिचा प्रियकर विकास व राजेंद्र हे चौघे एकाच मोटरसायकल वरून पावले वाडी खिंडीजवळ आले. तिथे त्यांनी निवृत्तीस तणनाशक औषध पाजले,व पायाने त्याचा गळा दाबला. त्याचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यावर हे तिघे त्याच मोटरसायकलवरून घोगाव कडे निघून गेले.
दरम्यान अंजना व विकास यांच्या अनैतिक संबंधाची माहिती निवृत्तीस समजली,त्याने अंजनाला समजावण्याचा वारंवार प्रयत्न केला. व या संबधास विरोध दर्शवला. याचा राग मनात धरून हा खून करण्यात आला. त्यांचा साथीदार राजेंद्र कांबळे हा विकास च्या ट्रॅकटवर चालक आहे. विभागीय ओलीस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे, डी.एन. वाईकर या मंडळींनी अवघ्या बारा तासाच्या आत ह्या खून प्रकरणाचा तपास लावला व संशयिताना ताब्यात घेतले. निवृत्ती शिंदे यांच्या पश्चात एक मुलगा, विवाहित मुलगी व भाऊ असा परिवार आहे.