१५ जून रोजी महाराष्ट्र बंद : जीवनावश्यक वस्तू जीएसटी मधून वगळाव्यात.
पुणे : जीवनावश्यक असलेल्या खाद्यान्नाच्या वस्तू जीएसटी (वस्तू व सेवा कर )मधून वगळाव्यात, या मागणीसाठी गुरुवार दि.१५ जून रोजी व्यापाऱ्यांनी राज्यव्यापी ‘महाराष्ट्र बंद ‘ ची हाक दिली आहे.पुणे येथील ‘ दि पुना मर्चंट्स चेम्बर ‘ इथं राज्यातील विविध भागातील ४०० व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबतची माहिती प्रवीण चोरबेले यांनी पत्रकारांना दिली.
यावेळी चेंबर चे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक वालचंद संचेती , पोपटलाल ओस्तवाल, राजेंद्र बाठिया, उपाध्यक्ष जवाहरलाल बोथरा , अशोक लोढा, सहसचिव रायकुमार नहार आदि उपस्थित होते.
आटा, रवा, मैदा, बेसन, मिरची, हळद, चिंच, खजूर, मनुके, सुट्टा चहा, यांसह जीवनावश्यक खाद्यान्न वस्तू ब्रँडेड अथवा अनब्रँडेड वस्तू जीएसटी मधून वगळाव्यात. सुका मेव्यावरील जीएसटी १२ % वरून ५ % करावा. कर आकारणी करताना वस्तूंचे वर्गीकरण सोपे असावे. जीएसटी चे जाचक नियम व कायदे वगळावेत. वीज, इंटरनेट, संगणक अशा सर्व सुविधांची पूर्तता होईपर्यंत जीएसटी आकारू नये. जीएसटी लागू केल्यानंतर करदात्यांना कायद्यातील तरतुदींची माहिती होण्यासाठी अवधी मिळावा, त्या अवधीमध्ये कोणताही दंड अथवा शिक्षा करण्यात येवू नये,आदि मागण्यांचे ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आले.
उपरोक्त मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधावे, यासाठी १५ जून रोजी राज्यव्यापी बंद पुकारण्यात येणार आहे, असेही प्रवीण चोरबेले यांनी सांगितले.