मांगरूळ इथं विजेचा शॉक लागून वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू
शिराळा : मांगरूळ तालुका शिराळा येथील शेतात विजेची मुख्य लाईन तुटून शेतात पडली होती. जनावरांना वैरण आणण्यासाठी गेलेल्या यशवंत रामा खांडेकर ( वय ७० वर्षे ),व त्यांची पत्नी सौ. पार्वती यशवंत खांडेकर (वय ६० वर्षे) या दाम्पत्याचा त्या तारेला स्पर्श झाल्याने विजेचा झटका बसला,व या वृद्ध दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. हि घटना आज २५ जून रोजी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान घडली.
याबाबत विठ्ठल खांडेकर यांनी कोकरूड पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. घटनास्थळावरून व पोलीसातून समजलेली माहिती अशी कि, मांगरूळ गाव च्या पूर्वेस यशवंत खांडेकर यांचे शेत आहे. त्यांच्या शेतावरून विजेची तार गेली आहे. आज सकाळपासून शिराळा तालुक्यात वाऱ्यासह रिमझिम पाऊस सुरु होता. गेल्या तीन चार दिवसापासून उसाच्या सरीत पाणी साठले होते. दुपारी जनावरांना वैरण आणण्यासाठी यशवंत आणि त्यांची पत्नी पार्वती हे वृद्ध दाम्पत्य शेतात गेले होते. त्यांच्या शेतात वरून गेलेली विजेची तार तुटून उसाच्या सरीत पडली होती. याची त्यांना कल्पना नव्हती. पाणी असल्यामुळे तुटलेल्या तारेतील विजेचा प्रवाह पाण्यात उतरला होता. पार्वती खांडेकर या पुढे असल्याने प्रथम त्यांचा स्पर्श विजेच्या तारेला झाला. त्यांना शॉक बसल्यामुळे त्या ओरडल्या. त्यांना बाजूला करण्यासाठी गेलेल्या यशवंत खांडेकरनाही विजेचा शॉक बसला. त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने शेजारील शेतात काम करीत असलेल्या महिलांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यावेळी त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे आढळून आले. त्यावेळी लोकांनी विद्युत कर्मचाऱ्याला हि घटना कळवून विद्युत पुरवठा खंडित केला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदना साठी शिराळा इथं नेण्यात आले . त्यंच्या पश्चात मुलगा व तीन मुली असा परिवार आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे अधिक तपास करीत आहेत.