२ ऑगस्ट रोजी मत्स्य संस्थांचा मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चा
शिराळा प्रतिनिधी : मुंबई मोर्चासाठी सांगली जिल्ह्यातील मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांचे शेकडो पदाधिकारी २ ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर जाणार असल्याची माहिती, महाराष्ट्र राज्य मत्स्य व्यवसाय सहकारी संघाचे उपाध्यक्ष महादेव कदम यांनी दिली. सांगली जिल्हा मत्स्य सहकारी संघाच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी मत्स्य व्यवसाय संघाचे अध्यक्ष रवींद्र कोकाटे, जिल्हा मत्स्य व्यवसाय अधिकारी प्रदीप सुर्वे, माजी अध्यक्ष सुभाष साळी यांची प्रमुख उपस्थित होती.
यावेळी श्री कदम पुढे म्हणाले कि, गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादकांवर शासन अन्याय करीत आहे. खाऱ्या पाण्यातील मत्स्य उत्पादकांना शासन जास्त अनुदान देते. एका जलाशयावर एकच संस्था असावी, अशा विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी प्रदीप सुर्वे म्हणाले कि, चांदोली येथील मत्स्य बीज प्रकल्पासाठी शासनाने दहा एकर जागा घेतली आहे. तेथे अल्पावधीत मत्स्य बीज केंद्र उभारणी होईल.कोरड्या तलावामध्ये पाच वर्षात तीन वेळा शासन मुदतवाढ देणार आहे. तलावाजवळ ठेका मुदतीपर्यंत मत्स्य संस्थांना जागा देण्याची मागणी शासनाने मंजूर केली आहे.
यावेळी धरणातील अचल साठ्यांचे २५ % पाणी आरक्षित व्हावे, जिल्हापरिषदेचे तलाव शासनाच्या मत्स्य विभागाने ताब्यात घ्यावेत, संस्थांचे कार्यक्षेत्र दहा किलोमीटर करावे,पोलीस व पाटबंधारे खाते मत्स्य व्यवसायाबाबत संवेदनशील नाहीत, त्यासाठी मत्स्य विभागाने पाठपुरावा करावा. ठेका रकमेत शासन वाढ करते, पण अनुदानात मात्र वाढ करीत नाही, ती वाढ ७० टक्क्यांपर्यंत करावीत,असे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
यावेळी संस्थांचे सचिव नौशाद सय्यद ,प्रकाश पाटील यांच्यासह जत, कवठेमहांकाळ, मिरज, आटपाडी, तासगाव, पलूस, शिराळा, वाळवा,खानापूर, कडेगाव तालुक्यातील संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. रवींद्र कोकाटे यांनी आभार मानले.