सामाजिक

शिराळकरांची प्रतीकात्मक नागांची प्रतिमा मिरवणूक : संयमी शिराळकर

शिराळा /प्रतिनिधी :
अनेक वर्षे जिवंत नाग पूजेची परंपरा जोपासणाऱ्या शिराळकरांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत, सलग चौथ्या वर्षी आपल्या उत्साही मनाला मुरुड घालत, जिवंत नागांऐवजी नागप्रतिमेची पूजा केली.
जिवंत नाग पूजा करणारे शिराळकर, कशी पूजा करणार याची उत्सुकता सकाळ पासून बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना व प्रशासकीय यंत्रणेला होती. परंतु अत्यंत संयमाने अंगावर पावसाच्या सरी झेलत, हजारो भाविकांच्या उपस्थितीत नागपंचमी साजरी करण्यात आली.
सकाळी सहा वाजले पासून नागमंडळे प्रतिकात्मक नाग घेऊन अंबामाता मंदिरात पूजेसाठी जात होते. त्या नंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. महिलांनीही अंबामातेच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
वन विभागाच्यावतीने ‘ साप: अंधश्रद्धा व गैरसमज ‘ या विषयी भित्ती पत्रकाच्या माध्यमातून ठिक ठिकाणी प्रबोधन करण्यात आले. नागपंचमी उत्साहात साजरी करण्यासाठी नागमंडळांनी मिरवणुकीसाठी पारंपरिक वाद्यांवर भर दिला होता. यामध्ये धनगरी ढोल, नाशिक ढोल, बेंड यांचा प्रामुख्याने समावेश होता. दुपारी अडीच वाजता महाजनांच्या घरी नागप्रतिमेची पूजा करून, पालखी अंबामाता मंदिराकडे नेण्यात आली. या पालखीचा मान भोई समाजाकडे आहे.
शिराळा आगाराच्या वतीने ज्यादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ४५० पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ४ उपविभागीय पोलीस अधिकारी , १४ पोलीस निरीक्षक, ३३ सहायक पोलीस निरीक्षक, फौजदार ३६५ पोलीस कर्मचारी,५९ महिला पोलीस,५०वाहतूक पोलीस, ११ डॉल्बी विरोधी पथके, मिरवणूकीवर १९ कॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्वान पथक, खिशेकापु विरोधी ४ पथके, गुंड विरोधी विशेष पथक, स्थानिक गुन्हे अन्वेषण अशी विविध पथके स्थापून मिरवणूक मार्गावर १६ सी.सी.टीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते.
वनविभागाने १६३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. त्यात १ उपवनसंरक्षक, २ विभागीय वनाधिकारी, ४ सहायक वनसंरक्षक, १० वनक्षेत्रपाल, २३ वनपाल, ४५ वनरक्षक, ८० वनमजूर यांचा समावेश होता. आरोग्य विभागाच्या वतीने पाडळी रोड तळीचा कोपरा, कोकरुड रोड एसटी स्टँड, शिराळा बसस्थानक, यादव हार्डवेअर, नगर पंचायत, व्यापारी असोसिएशन हॉल, मांगले रोड या सात ठिकाणी आरोग्य पथके नेमली होती. विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी विद्युत वितरणने १०ठिकाणी पथके नेमली होती.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराडे, उपविभागीय पोलीस अधीक्षक किशोर काळे, मुख्यवनसंरक्षक अशोक पाटील, उपवनसंरक्षक भारतसिंग हाडा, सागर गवते, विभागीय वनाधिकारी माणिक भोसले, वनक्षेत्रपाल तानाजी मुळीक, विभागीय माहिती संचालक सतीश लळीत, जिल्हा शल्यचिकित्सक संजय साळुंखे यांनी भेट देऊन पाहणी केली.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!