अवकाळी पावसामुळे पडझड झालेल्या घरांना नुकसानभरपाई द्यावी – सत्यजित देशमुख
शिराळा,(प्रतिनिधी ) : वादळी वारे व पावसाने शिराळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरांची पडझड होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करून शासनाने तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी केली. वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्या भागाची पाहणी प्रसंगी बोलत होते.
यावेळी देशमुख पुढे म्हणाले कि,सलग २-३ दिवसात वादळी वाऱ्यांमुळे तालुक्यातील येळापूर खोरा, मेणी खोरा, गुढे, पाचगणी पठार, कोकरूड सह उत्तर विभागातील वाकुर्डे खुर्द, शिरशी भैरेवाडी, घागरेवाडी, बांबवडे, टाकवे, निगडी, औंढी यासह अनेक गावातील घरांचे मोठे नुकसान झाले आहे. घराचे पत्रे उडून गेले आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी पत्रा लागून लोक जखमी झाले आहेत. प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करावेत, व नुकसान भरपाई द्यावी.
यावेळी पोलीस पाटील संदीप माने, श्रीकांत माने, संजय पाटील, शामराव पाटील, गणपत पाटील उपस्थित होते.