पाकिस्तानी हल्ल्यात शाहुवाडी तालुक्यातील गोगवे चे सुपुत्र श्रावण बाळकू माने शहीद,तर औरंगाबादचे जाधव यांना वीरमरण
बांबवडे : पाकिस्तानी लष्कराने नियंत्रण रेषेवर पुन्हा एकदा भ्याड हल्ला केला आहे. या हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाले असून त्यापैकी एक श्रावण बाळकू माने रहाणार गोगवे तालुका शाहुवाडी जि.कोल्हापूर येथील आहे.व औरंगाबादचे नाईक संदीप जाधव हे देखील शहीद झाले आहेत.
३५ वर्षीय संदीप जाधव गेल्या १५ वर्षांपासून लष्करात होते. तर २५ वर्षीय श्रावण बाळकू माने गेल्या ४ वर्षापूर्वी सेवेत रुजू झाले होते. जम्मू मधील पूँछ विभागात पाकिस्तानी लष्कराच्या ‘ बॅट ‘ तुकडीने हा हल्ला केला. भारतीय लष्कराने प्रत्युतरादाखल केलेल्या हल्ल्यात ‘बॅट ‘ चा एक सैनिक ठार ,तर एक सैनिक जखमी झाला.
दरम्यान शहीद श्रावण बाळकू माने हे शाहुवाडी तालुक्यातील असून, त्यांचे प्राथमिक शिक्षण गोगवे इथं,तर माध्यमिक शिक्षण बांबवडे इथं पार पडलं. श्रावण माने यांचे वडील देखील सैन्यात होते. त्यांचा भाऊ सागर बाळकू माने हा देखील सैन्यात कर्तव्य बजावत आहे.
संदीप जाधव यांना अडीच वर्षांची मुलगी आणि पाच वर्षांचा मुलगा आहे. दरम्यान शाहुवाडी तालुक्यात गोगवे गावचे सुपुत्र श्रावण माने शहीद झाल्याची बातमी कळताच गोगवे सह तालुक्यावर शोककळा पसरली आहे.