शिराळा सेतू कार्यालयास दहा हजार रुपयांचा दंड
शिराळा : शिराळा येथील सेतू कार्यालयास येथील तहसीलदार दीपक शिंदे यांनी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, येत्या २४ तासात दंड न भरल्यास सेतू चा ठेका कायम स्वरूपी बंद करण्यात येईल, असेही या शिक्षेत सुनावले आहे. जिल्हाधिकारी विजय काळम -पाटील यांनी सेतू कार्यालयास भेट दिली असता, याठिकाणी अनेक उणीवा आढळल्या, तसेच सेतू मधील कामे वेळेत होत नसल्याचे दिसून आले. तसेच शाळेसाठी लागणारे दाखले त्वरित देण्यात यावेत,असे शासनाचे सक्त आदेशच देण्यात आले आहेत. नूतन जिल्हाधिकारी यांनी पदभार स्वीकारताच पहिलाच दणका सेतू कार्यालयास दिला आहे.
याबाबत समजलेली हकीकत अशी कि, जिल्हाधिकारी यांनी विविध शाखांना भेटी देण्याची माहिती याअगोदर दोन ते तीन वेळा देण्यात आली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी अचानक सेतू कार्यालयास भेट दिली असता, सेतू व्यवस्थापक गैहजर असल्याचे दिसून आले, तसेच कार्यालयात फक्त संगणक ऑपरेटर होते. त्यांना प्रश्न विचारले असता, चुकीची माहिती देण्यात आली, तसेच अनेक दाखले प्रलंबित असल्याचे दिसून आले. शासनाने शैक्षणिक संदर्भाने असलेले दाखले त्वरित देण्याचे आदेश देवूनही कामात हलगर्जीपणा दिसून आला. यामुळे जनमानसात शासनाची प्रतिमा मलीन होत आहे. अशा कारणांमुळे तहसीलदार दीपक शिंदे यांनी सेतू कार्यालयावर कारवाई करून दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, २४ तासात दंड न भरल्यास ठेका कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.