“‘ एक धक्का और दो ‘-‘ एक मराठा ,लाख मराठा ‘ “
बांबवडे : ‘ एक धक्का और दो ‘ , संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षण बाबत रान उठले आहे. अनेक जिल्ह्यात निघालेले शांततापूर्ण मोर्चे सगळ्यांनाच अनुकरणीय ठरले. परंतु या सगळ्या मोर्चातून शासनाने फलित काही दिले नाही. म्हणूनच राज्य शासनाला शेवटचा धक्का देण्याची गरज, मराठा मोर्चा आयोजकांना वाटली. आणि ९ ऑगस्ट क्रांतीदिनी खऱ्या अर्थाने मराठा क्रांती घडविण्यासाठी विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मराठा मोर्चा मध्ये मराठ्यांनी सहभाग घेवून मराठा समाजाची ताकद दाखविण्याची वेळ आली आहे. म्हणूनच उद्या ९ ऑगस्ट क्रांतीदिनी मुंबईतील आयोजित मराठा मोर्चाला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजाकांच्यावतीने करण्यात आले आहे.
आजवर अनेक समाजांना आरक्षण देण्यात आले, कारण गेली अनेक वर्षे या समाजावर अन्याय झाल्याने त्यांची उन्नती होवून त्यांची आर्थिक प्रगती व्हावी. यासाठी मराठा समाजाने मान्यता सुद्धा दिली. परंतु खऱ्या अर्थाने या आरक्षित समाजाची उन्नती झाली आहे का? याचे मुल्यांकन मात्र झाले नाही. त्यामुळे आरक्षणाने इतर समाजातील पिढी पुढे जात राहिली, आणि मराठा समाजाची पिढी मात्र बहुसंख्य असल्याने आरक्षणाच्या उंबरठ्यावरच राहिली. त्यामुळे आर्थिक नुकसान होत असतानाही हा समाज मुकाटपणे सहन करत राहिला. परंतु जेंव्हा कोपर्डी प्रकरण घडले, तेंव्हा मराठा समाजाच्या सहनशीलतेचा बांध फुटला. आपल्या पोरीबाळी सुरक्षित नसल्याची जाणीव सकल मराठा समाजाला झाली, आणि तेंव्हापासून मराठा समाज एक झाला. आपल्या पोरीबाळींना संरक्षण मिळावे, आपल्या समाजालाही आरक्षण मिळावे,ज्या माध्यामातून आपली तरुण पिढी उत्कर्ष करेल. पण एवढे मोर्चे निघूनही शासनाला जर जग येत नसेल , तर एका विराट मोर्चाची गरज मराठा समाजाला भासली, मुंबई इथं हा मोर्चा आयोजित करण्याचे निश्चित झाले. आणि क्रांतीदिनी हा मराठा मोर्चा उद्या निघणार आहे.