चाऱ्याच्या शोधात गवा जखमी
सोंडोली (प्रतिनिधी ) : मालगांव तालुका शाहुवाडी येथील मालगांव-जांबूर गावच्या हद्दीवर मादी जातीचा गवा ग्रामस्थांना जखमी अवस्थेत आढळला. ग्रामस्थांनी हि घटना वनविभागाला कळविल्यानंतर, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येवून पाहणी केली. शित्तूर-वारुण पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी गव्यावर उपचार केले.
येथील वडाचा माळ शेताजवळ दरडी वरून पडल्याने मादी जातीचा गवा गंभीर जखमी झाला होता. त्याचे अंदाजे वय बारा ते पंधरा महिन्याचे असावे. त्याच्या पोटाच्या पुढील बाजूस गंभीर जखम झाली असून, मणका मोडला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी शेळके यांनी दिली. जांबूर मालगांव हि गावे डोंगराच्या पायथ्याशी असल्याने जंगली प्राण्यांचा वावर इथं सातत्याने आढळून येतो. सध्या उन्हाळा कडक असल्याने जंगलात पाण्याचा आणि चाऱ्याचा तुटवडा भासत असल्याने हि श्वापदे गावाच्या परिसरात चारा आणि पाण्याच्या शोधात येतात.
घटनास्थळी पळसवडे बीट चे वनपाल जगन्नाथ मादने,वनमजूर मारुती पाटील,शंकर जाधव, बाजीराव पाटील उपस्थित होते.