देशात आजपासून एक कर प्रणाली : जीएसटी
बांबवडे : देशात आज १ जुलै पासून जीएसटी कर प्रणाली लागू होणार आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर देशभरात एकच करप्रणाली लागू होणार आहे. त्यामुळे काही वस्तू महागणार आहेत. याचा परिणाम वयैक्तिक जीवनावरही होणार आहे.
जीएसटी नंतर नागरिकांची १७ वेगवेगळ्या करांमधून १ जुलैपासून सुटका होणार आहे. संसदेच्या सेन्ट्रल हॉलमध्ये दिग्गजांच्या उपस्थितीत जीएसटी च लोकार्पण केलं जाईल. सध्याच्या कर प्रणालीत राज्य आणि केंद्राचे मिळून वेगवेगळे १७ प्रकारचे कर भरावे लागतात.
जीएसटी मध्ये ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के, आणि २८ टक्के असे टॅक्स स्लॅब ठेवण्यात आले आहेत. देशातील ८१ टक्के वस्तू ०-१८ टक्के टॅक्स स्लॅब मध्ये येतात. त्यामुळे जास्तीत जास्त वस्तू स्वस्त होणार आहेत, तर काही वस्तू महाग होतील.
१जुलै पासून देशात प्रत्येक वस्तूची किमत विविध ठिकाणी सारखीच असेल. तुम्ही मुंबईतून वस्तू घेतली कि दिल्लीतून , त्याच्या किमतीत काहीही बदल होणार नाही. एमआरपी नुसारच वस्तूची विक्री केली जाईल. विक्रेत्याने एमआरपी वस्तू न दिल्यास त्याची तक्रार करण्याचा अधिकार ग्राहकांना आहे. जीएसटी नंतर व्यापाऱ्यांना कर भरणं अधिक सुलभ होणार आहे. अगोदर कर भरण्यासाठी वेगवेगळे फॉर्म भरावे लागत होते.आता महिन्याला एक आणि वर्षाला एक असे १३ फॉर्म भरावे लागणार आहे.
जीएसटी नंतर वेगवेगळ्या कराचा बोजा पडणार नाही. एखाद्या व्यापाऱ्याने कच्च्या मालावरच कर भरला असेल, तर त्याला वस्तू तयार झाल्यानंतर वाढलेल्या किमतीवरच कर भरावा लागेल. उदाहरणार्थ १०० रुपयांच्या कच्च्या मालावर १२ टक्के कर असेल, तर वस्तू तयार झाल्यानंतर १०० रुपयांवरच कर लागेल, ११२ रुपयांचा कर भरावा लागणार नाही. आणि ग्राहकांनाही वस्तू स्वस्तात मिळेल.
जीएसटी लागू झाल्यानंतर रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. येत्या तीन महिन्यात ५० हजार जणांना रोजगार मिळणार आहे. टॅक्स आणि सॉफ्टवेअर कंपन्यांनी आतापासूनच कर्मचारी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. यामुळे सरकार कडे येणारा कर वाढेल, आणि त्याचा वापर विकासकामांसाठी करणं सोपं होईल.