उद्या १५ जून रोजी शिराळ्याच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदांची निवड
शिराळा : उद्या दि. १५ जून रोजी शिराळा नगरपंचायत च्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवड आहे. दरम्यान नगराध्यक्ष पदासाठी सौ.सुनंदा सोनटक्के यांचा एकमेव अर्ज राहिला असल्याने, त्यांची निवड बिनविरोध होणार आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी कीर्तीकुमार पाटील , गौतम पोटे, संजय हिरवडेकर यांची नावे चर्चेत आहेत. दरम्यान कीर्तीकुमार पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी राजेंद्र जाधव काम पहाणार आहेत.
शिराळा नगरपंचायती ची हि पहिलीच निवडणूक झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने १७ पैकी ११ जागा मिळवून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. नगराध्यक्ष पद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग,स्त्रीवर्गासाठी राखीव आहे. सुनंदा सोनटक्के यांचा एकमेव अर्ज नगराध्यक्ष पदासाठी राहिला आहे. त्यामुळे सौ.सोनटक्के या बिनविरोध नगराध्यक्ष होणार असून, केवळ जाहीर सुनावणी बाकी आहे. याची अधिकृत घोषणा उद्या दि.१५ जून रोजी करण्यात येईल.
उपनगराध्यक्ष पदासाठी उद्या दि.१५ जून रोजी सकाळी १० ते दुपारी २.०० हि नामनिर्देशन अर्ज भरण्याची वेळ आहे. नगराध्यक्ष निवड झाल्यानंतर लगेचच उपनगराध्यक्ष पदासाठीच्या अर्जाची छाननी करण्यात येईल. त्यानंतर १५ मिनिटांनी अर्ज माघार व लगेच निवड करण्यात येणार आहे. शिराळा नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी सौ.सुनंदा सोनटक्के निश्चित झाल्या असून, उपनगराध्यक्ष पदासाठी कोणाचे नाव जाहीर होतेय, याचीच उत्सुकता शिराळकरांना लागून राहिली आहे.