शाहुवाडी पंचायत समिती सभापती पदी डॉ.जाधव तर उपसभापती पदी दिलीप पाटील
मलकापूर (प्रतिनिधी ) : शाहुवाडी पंचायत समितीच्या सभापती पदी शिवसेना राष्ट्रवादी आघाडी कडून पणुद्रें पंचायत समिती मतदार संघातून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेल्या सौ. डॉ. स्नेहा जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तर उपसभापती पदी भेडसगाव गणातून विजयी झालेले दिलीप पाटील यांची निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसिलदार चंद्रशेखर सानप होते.
शाहुवाडी पंचायत समितीच्या सभापती पदासाठी सर्व साधारण गटातील महिला आरक्षण पडले होते. त्यामुळे निवडणूकी च्या सुरुवातीपासूनच सर्व साधारण गटासाठी खुल्या असलेल्या सरूड आणि पिशवी या दोन्ही मतदार संघात चुरशीच्या लढती झाल्या होत्या. राजकीय सत्तेच्या गोळा बेरजेत अचूक उत्तर साधण्यासाठी निवडणूक पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडींमध्ये शाहुवाडी च्या निवडणूकीला चांगलीच रंगत आली होती. शिवसेना राष्ट्रवादी आघाडीने आठ जागा पैकी सहा जागा जिकूंन आपली सत्ता आणली, तर विरोधी जनसुराज्य, भाजप आणि करणसिंह गायकवाड गट या आघाडीने दोन जागा जिकूंन आपली ताकद ही सिद्ध केली आहे.
या दोन्ही खुल्या गटातील लढतीत सरूड मधुन शिवसेनेच्या सौ लतादेवी पाटील या विजयी झाल्या, तर पिशवी मतदार संघातून राष्ट्रवादी च्या घड्याळ चिन्हावरील सौ अश्विनी पाटील या विजयी झाल्या. त्यामुळे खुल्या गटातील दोन्ही उमेदवारांना सभापती पदावर संधी मिळणार अशी चर्चा रंगली होती.
पूर्वीच्या काॅग्रेस पक्षाच्या माजी जिल्हा परिषद सदस्यां सौ डॉ स्नेहा जाधव यांनी पंचायत समितीच्या निवडणूक पार्श्वभूमीवर शिवसेनेचे धनुष्य हाती घेऊन अनुसूचित जाती जमाती गणासाठी राखीव असलेल्या, पणुद्रे पंचायत समिती मतदार संघातून निवडणूक लढवली आणि या लढतीत जनसुराज्य पक्षाच्या सौ कमल जाधव यांचा पराभव करून स्नेहा जाधव विजयी झाल्या.
पणुंद्रे जिल्हा परिषद मतदारसंघाचं नेतृत्व केलेल्या सौ. डॉ. स्नेहा जाधव यांच्यावर आता तालुक्याच्या सभापती पदाची जबाबदारी पडल्याने त्यांच्या कडून तालुक्यात विकास कामांना गती मिळण्याची अपेक्षा सर्व सामान्य जनतेतू व्यक्त केली जात आहे.
उपसभापती पदी दिलीप पाटील=
शिवसेना राष्ट्रवादी आघाडीच्या सहा जागांपैकी चार जागा महिलांनी जिकंल्या आहेत, तर भेडसगाव पंचायत समिती मतदार संघातून दिलीप पाटील तर करंजफेण पंचायत समिती मतदार संघातून माजी उपसभापती आणि विद्यमान सदस्य पांडुरंग पाटील यानी आपला विजय साकारला आहे. राजकीय समतोल साधताना नविन चेहरा म्हणून भेडसगाव पंचायत समिती मतदार संघातून निवडूणआलेले दिलीप पाटील यांच्या वरच उपसभापती पदाची जबाबदारी टाकली आहे.
एकुणच शाहुवाडी पंचायत समिती शिवसेना राष्ट्रवादी आघाडीने आपली सत्ता आणली असली, व सभापती आणि उपसभापती पदावर शिवसेनेने आपला भगवा फडकवला आहे.