अल्पसंख्यांकांच्या उन्नतीसाठी योजनाची अंमलबजावणी करा- शाम तगडे यांचे निर्देश
कोल्हापूर (प्रतिनिधी ) : अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक,आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी शासन राबवीत असलेल्या योजनांची सर्व यंत्रणांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश अल्पसंख्यांक विकास विभागाचे प्रधान सचिव शाम तागडे यांनी आज इथं बोलताना दिले.
अल्पसंख्यांकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी, जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.
श्री तागडे पुढे म्हणाले कि, अल्पसंख्यांक सामुदायासाठीच्या योजनांचा दोन-तीन महिन्यातून जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा. तसेच अल्पसंख्यांक समूहासाठी शिक्षण, वसतिगृह, घरकुल, शिष्यवृत्ती, विविध बँकांकडील कर्जप्रकरणे, बचतगट, अशा अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी सर्वच अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. बँकांनी अल्पसंख्यांक समूहासाठीची कर्जप्रकरणे प्राधान्यक्रमाने मंजूर करावीत, तसेच अल्पसंख्यांकांसाठी घरकुलांचे प्रस्तावही प्राधान्यक्रमाने मार्गी लावावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.
मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाने त्यांच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक कर्ज योजना, तसेच थेट कर्ज योजनांची अंमलबजावणी करून अल्पसंख्यांकांना सहाय्यभूत ठरावी,या महामंडळाच्या सक्षमी कारणासाठी शासनाने प्राधान्य दिले असल्याचेही तागडे म्हणाले.
या बैठकीला जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, पोलीस उपाधीक्षक सतीश माने, प्रकल्प संचालक डॉ. हरीश जगताप, जिल्हा प्रकल्प अधिकारी नितीन देसाई, राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.जि.बुटे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी आर,बी.भालेराव, यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.