हारुगडेवाडी इथं दारूबंदी न झाल्यास उग्र आंदोलन : महिला शिष्ट मंडळाचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा
बांबवडे : हारुगडेवाडी तालुका शाहुवाडी इथं गावातील आरोग्य धोक्याची पातळीवर उभे असून ,हे गाव दारूमुक्त होणे, हि काळाची गरज असून, प्रशासनाने ह्याकडे गांभीर्याने लक्ष देवून इथं दारूबंदी आमलात आणली पाहिजे, अन्यथा उग्र आंदोलन महिलांच्या वतीने करण्यात येईल,असे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे सांगण्यात आले आहे.
सोमवार दि.१९ जून रोजी संपूर्ण दारूबंदीसाठी महिलांच्या शिष्टमंडळाने हारुगडेवाडी येथील ३८७ महिलांच्या स्वाक्षऱ्या असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना दिले आहे. यावेळी महाराष्ट्र दारूबंदी संघर्ष समितीचे निमंत्रक गिरीश फोंडे, शाहुवाडी शाखा संघटक संग्राम पाटील- शिवारेकर यांच्यासह मनीषा नालुगडे, नंदा नालुगडे, शांता रावण, अनिता शिंदे, सविता रावण, लक्ष्मी रावण, मंदा पवार, जयश्री पवार, या महिला शिष्टमंडळातील सदस्या उपस्थित होत्या.
हारुगडेवाडी तालुका शाहुवाडी इथं एक परवानाधारक बीअर शॉपी असून गावातीलच अन्य काही ठिकाणी अवैधरीत्या दारूविक्री होत असल्याचे, या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे कि, या दारू व्यवसायातून गेल्या दहा वर्षांच्या काळात गावातील अनेक पुरुष व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. दारूच्या अतिसेवनाने काही जणांचा मृत्यूही झालेला आहे. शाळा, महाविद्यालयीन शिक्षण घेणारे येथील काही तरुणही व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे, महिला अत्याचारासारख्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने यावर त्वरित कारवाई करावी . तसेच प्रशासनाने हारुगडेवाडी गावातील संपूर्ण दारूबंदीसाठी महिलांचे गुप्त मतदान प्रक्रियेसाठी सहकार्य करावे, अशी विनंती करून याबाबत प्रशासनाने त्वरित हालचाल न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलक महिलांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी हिंदुराव नालुगडे , बंडा हारुगडे, मारुती रावण, बाबुराव खबाले, हिंदुराव खबाले, विश्वास अस्वले, विठ्ठल हारुगडे, बबन अस्वले आदि दारूबंदीसाठी पुढाकार घेतलेले स्थानिक नागरिकही उपस्थित होते.