कापरी इथं तरुणाचा शेतात मृत्यू : मृत्यूचे कारण समजू शकले नाही.
शिराळा : कापरी तालुका शिराळा येथील निकम मळा इथं शेतात मशागती चे काम करण्यासाठी पॉवर ट्रेलर घेवून गेलेल्या संतोष जयसिंग कदम (वय २० वर्षे )रहाणार सुजयनगर या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
हि घटना दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत विकास जयसिंग कदम यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत पोलीसातून मिळालेली माहिती अशी कि, संतोष कदम व गणेश माने हे दोघे दोन पॉवर ट्रेलर घेवून कुलदीप निकम यांच्या शेतात मशागतीच्या कामासाठी गेले होते. काम करत असताना, गणेश कामात व्यस्त होता. पण अचानक संतोष कुठे दिसत नाही, हे त्याच्या लक्षात आले. त्यावेळी संतोष काम करत असल्याच्या ठिकाणाकडे पहिले असता, पॉवर ट्रेलर पलटी झाल्याचे त्याला दिसून आले. त्या पॉवर ट्रेलर जवळ संतोष बेशुद्ध अवस्थेत दिसला. त्यास उपचारासाठी शिराळा ग्रामीण रुग्णालयात नेले असता, त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. याबाबत त्याचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्याच्या मृत्यू चे कारण अद्याप समजू शकले नाही. संतोषच्या पश्चात आई, वडील, चार बहिणी व एक भाऊ असा परिवार आहे.
अधिक तपास शिराळा पोलीस ठाण्याचे हवालदार बी.के. पाटील करीत आहेत.