वारणा नदीत कोडोलीचा तरुण गेला वाहून
कोडोली प्रतिनिधी:-
कोडोली ता.पन्हाळा येथील शेंडे कॉलनी इथं रहणारा सनी अरुण चौगुले वय ३३ हा तरुण दिनांक २९ जून रोजी चिकूर्डे येथे वारणा नदीमध्ये मासे पकडण्यासाठी गेला असता, सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्याचा तोल जाऊन तो वारणा नदीत पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली असून, कोडोली पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
सनी चौगुले हा कोडोली येथील शेंडे कॉलनी येथे आपल्या आई सोबत वास्तव्यास आहे. काल ४ वाजण्याच्या सुमारास सनी आणि त्याचा मित्र थॉमस विजयकुमार बोर्डे हे मासे पकडण्यासाठी चिकूर्डे येथील वारणा नदी मध्ये गेले होते. यावेळी सनी चौगुले हा दारूच्या नशेत होता. ५ वाजण्यास सुमारास मासे पकडता पकडता सनी याचा तोल जाऊन तो नदी पात्रात पडला. यावेळी पाऊस सुरू असल्याने व पाण्याचा प्रवाह तीव्र असल्याने सनी हा पाण्याच्या प्रवाहा बरोबर वाहून गेला.
कोडोली पोलीस सनी चौगुले याचा शोध घेत असून, याबाबत अधिक तपास कोडोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव हे करत आहेत.