दिवंगत आम. पाटील यांचे वस्तू शिल्प उभारू -नाम. चंद्रकांत दादा पाटील
कोडोली ( प्रतिनिधी ) : पन्हाळा, गगन बावडा, वैभववाडी मतदारसंघाचे दिवंगत माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांच्या कार्यातून भावी पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी शासन स्तरावर त्यांचे वास्तुशिल्प उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे महसूलमंत्री नाम. चंद्रकांत दादा पाटील यांनी कोडोली येथे सांगितले.
ते दिवंगत आम. यशवंत एकनाथ पाटील यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देण्यासाठी आले होते.
ते पुढे म्हणाले कि, जीएसटी लागू करण्यासंदर्भात विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले होते, अधिवेशनाच्या सुरुवातीलाच दिवंगत आम.यशवंत पाटील यांच्या शोकप्रस्तावावर चर्चा करताना, अनेक सदस्यांनी त्यांच्याबद्दल च्या आठवणी सांगितल्या. कोल्हापूर जिल्ह्याच्या रांगड्या व्यक्तिमत्वाचा ठसा आजही महाराष्ट्र भर आहे.कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान आहे.
आम.यशवंत दादा यांच्या वास्तू शिल्पाचे योग्य आराखडे वास्तुविशारदाकडून करून घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. तर यासंदर्भात शासकीय स्तरावर सर्वकष प्रयत्न आपण करू, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार पाटील यांचे नातू डॉ. जयंत पाटील, डॉ. अभिजित इंगवले, सर्वोदय सेवा संस्थेचे चेअरमन लक्ष्मणराव कुलकर्णी, अरविंद पाटील, सुभाष पोवार, शरद देसाई, लालासो पाटील, यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव दिनकर पाटील, अजितसिंह काटकर, अविनाश चरणकर, पन्हाळा तहसील कार्यालयाचे तहसीलदार रामचंद्र चोबे, नायब तहसीलदार माधवी जाधव, अमित भोकरे, गट विकास अधिकरी प्रियदर्शनी मोरे, कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक संदीप बोरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.