संपादकीय

….इथंच माणुसकीनं माती खाल्ली

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला.आणि अधिकारी वर्ग सैरावैरा पळाला. पण इरफान शेख स्वतः च्या जीवाची पर्वा न करता हेलिकॉप्टरजवळ गेला, हेलिकॉप्टर चे दर उघडत नव्हते, ते त्याने उघडले, आणि मुख्यमंत्री साहेब सुखरूप बाहेर आले. परंतु आपल्याला कोणी वाचवले, हे मात्र साहेब विसरले. आणि इरफान, एक गोष्टीतला देवदूत च राहिला. नंतर अधिकारी, पोलीस आले, पण ज्याने वाचवले, तो मात्र कक्षेच्या बाहेरंच राहिला. त्याला काही तुमच्याकडून बक्षीस नको होते. फक्त शाबासकीची थाप एका नागरिकाला आपल्या मुख्यमंत्र्यांकडून हवी होती, ती द्यायला साहेब विसरले, आणि इथंच माणुसकीनं माती खाल्ली.
काल दि.२५ मे रोजी मुख्यमंत्री लातूर हून मुंबई ला यायला निघाले, तेंव्हा हेलिकॉप्टर मध्ये बिघाड झाला, आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर कोसळले. यावेळी त्यांच्याजवळ पायलट व आतील सहकारी सोडून कोणीच नव्हते. हेलिकॉप्टर चा स्फोट होईल, या भीतीने कोणी अधिकारी ,पोलीस जीवाच्या भीतीने अगोदर जवळ गेले नाही. पण त्यावेळी भंगार चं दुकान चालवणारा इरफान हा अपघात पाहत होता. इतर कोणी जवळ जात नाही असं,पाहता हि व्यक्ती जीवाची पर्वा न करता हेलिकॉप्टर जवळ गेली, त्याने दरवाजा उघडला ,आणि मुख्यमंत्री सुखरूप बाहेर आले. पण याचं भान ना मुख्यमंत्र्यांना राहीलं,आणि ना अधिकाऱ्यांना राहीलं.
साहेब तुमच्याकडे एवढा ताफा होता, पोलीस फाटा होता, पण जेंव्हा जीवावर बेतते, तेंव्हा तुमची हि पिलावळ उपयोगाला येत नाही. तिथे उपयोगाला येते, ती माणुसकी. ‘ इरफान ‘ च्या रूपाने ती आली, तिने मदत केली, आणि निघून गेली. अशावेळी जेंव्हा आपण खऱ्या मदतगाराला विसरतो, तेंव्हा मात्र माणसाचा माणुसकीवरचा विश्वास उडू लागतो. इरफान ची तुमच्याकडून काहीच अपेक्षा नव्हती, फक्त तुमचे जीव वाचवले म्हणून, केवळ थँक्स म्हटला असता, तरी त्याला आभाळ ठेंगणे झाले असते. पण झेड प्लस सुरक्षेचे आपण मानकरी, एका साध्या भंगारवाल्याला थँक्स कसे म्हणणार, ते आपल्या पेशाला शोभले नसते. असो. आभार मानणं हे ज्याच्या त्याच्या पत वर अवलंबून असतं.
इरफान, कुणी तुझे आभार मानो, अथवा न मानो, पण,सध्याच्या या काळात, जात, धर्म विसरून तू केलेल्या मदतीला नक्कीच सलाम.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!