शिराळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी कोणाची वर्णी ? : शिराळकरांची उत्सुकता शिगेला
शिराळा : शिराळा नगरपंचायत चे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांची निवड दि.१५ जून रोजी होणार आहे. असे आदेश जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी दिले आहेत. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिराळा नगरपंचायत ची पहिलीच निवडणूक झाली आहे. या निवडणुकीत १७ पैकी ११ जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने जिंकल्याने त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले आहे. नगराध्यक्ष पद हे ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री ‘ साठी राखीव आहे. याठिकाणी भाजप चा उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदावर त्यांचा दावा असल्याची सर्वत्र चर्चा होती. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेस मधून सर्वसाधारण गटातून नागरिकांचा मागास प्रवर्गातील तीन स्त्री उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे हे तीन उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी गृहीत धरले जातात, असा राष्ट्रवादी चा दावा आहे. त्यामुळे नगराध्यक्ष कोण होणार ,याची उत्सुकता शिराळकरांना लागली आहे.
नगराध्यक्ष पदासाठी बुधवार दि.७ जून रोजी सकाळी १० ते २ वाजेपर्यंत अर्ज दाखल करणे, दुपारी २ नंतर छाननी, सायंकाळी ५ वजता उमेदवारी नाकारलेल्यांची याद्दी प्रसिद्ध करणे. ९ जून सायंकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारी नाकारलेल्यांची अपीलाची मुदत आहे. १२जुन रोजी वैध अर्जांची यादी प्रसिद्ध करणेत येईल. १३जुन नामनिर्देशन अर्ज माघारीची मुदत आहे. १५ जूनला नगराध्यक्ष निवड आहे. आवश्यकता असल्यास मतदान व मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येईल.
१५ जून रोजी उपनगराध्यक्ष पदासाठी सकाळी १० ते २ वाजेपर्यंत नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात येतील . नगराध्यक्ष निवडीनंतर उपनगराध्यक्ष पदासाठी आलेल्या अर्जांची छाननी करण्यात येईल. त्यानंतर १५ मिनिटात अर्ज माघार व उपनगराध्यक्ष पदाची निवड करणेत येईल. त्यामुळे बहिष्काराच्या मुद्द्यावर गाजलेल्या या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागणार याचीच सर्वत्र चर्चा होत आहे.