शेतकऱ्यांनी कर्जच काढू नये,यासाठी प्रयत्नशील -नाम. चंद्रकांतदादा पाटील
बांबवडे : ” यापूर्वीच्या शासनाने शेतकरी वर्षानुवर्षे गरीब कसा राहील, तो कर्जे काढून बँक आणि सावकारांच्या कर्जात कसा अडकून राहील, यासाठीच प्रयत्न केले.मात्र भाजप सरकार, शेतकऱ्याने कर्ज काढूच नये, यासाठी प्रयत्न करीत आहे.” असे प्रतिपादन पालकमंत्री नाम. चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.
आज दि.२६ मे रोजी सरूड, भेडसगाव ,साळशी, पिशवी आदि गावात ‘शिवार संवाद यात्रे ‘च्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधला. साळशी तालुका शाहुवाडी येथील जुने बिरोबा मंदिर इथं शेतकऱ्यांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी वरील प्रतिपादन केले.
नामदार पाटील यावेळी पुढे म्हणाले कि, शासनाला कर्जमाफी द्यायची आहे, पण त्याअगोदर शेतकऱ्याला सक्षम करायचे आहे. यासाठी शेतीतील मुलभूत गोष्टींवर खर्च करून विविध योजना शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोह्चवायाच्या आहेत. यासाठी शासन प्रयत्नशील आहे. विरोधकांचे कर्जमाफीवरून केवळ राजकारण सुरु आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काहीही घेणे-देणे नाही. भाजप शासनाने आत्तापर्यंत ५१ लाख क्विंटल तूर खरेदी केली आहे . मात्र आघाडी सरकारच्या काळात केवळ तीन लाख क्विंटल तूर खरेदी केली होती. शेतीसाठी राज्यात कृषी विभागाकडून ३५ हून अधिक योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तसेच शेतकऱ्यांनी कर्ज काढूच नये, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी माती परीक्षण, ठिबक सिंचन, शेततळी, हवामानाची पूर्व सूचना देणारी यंत्रणा, जमिनींचे हेल्थ कार्ड यासारख्या मुलभूत गोष्टींवर शासन मोठी गुंतवणूक करीत आहे. गेल्या तीन वर्षात ‘जलयुक्त शिवार ‘ योजनेवर शासनाने ४ हजार कोटी रुपये खर्च केले असून, राज्यभरात ११ हजार गावात या योजनेची कामे सुरु आहेत.
यावेळी गोकुळचे संचालक बाबा देसाई यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी भाजप चे जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, माजी उपसभापती महादेवराव पाटील, जि.प.सदस्य विजय बोरगे, तालुकाध्यक्ष दाजी चौगुले, तहसीलदार चंद्रशेखर सानप, गटविकास अधिकारी डॉ. उदय पाटील, उद्योगपती तानाजी मगदूम, ग्रामसेवक एन.डी.खोत आदि मान्यवर उपस्थित होते.